रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष
तुळजापूर : ग्रामीण भागातील रस्ते म्हणजे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. अनेक गावांना जोडणाऱ्या मार्गावरील डांबर व गिट्टी उखडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून, अशीच परिस्थिती तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा ते किलज या रस्त्याचीही झाली आहे.
काक्रंबा ते किलज हा जवळपास २५ ते ३० किमी अंतराच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे सध्या अक्षरश: चाळण झाली आहे. परिणामी, हा मार्ग अपघातप्रवण क्षेत्र ठरत आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी, चारचाकी, एसटी बस चालकांना वाहने चालविताना खड्डे चुकावत मार्ग काढावा लागत असून, काही वेळा अपघातही घडले आहेत, तसेच खड्ड्यामुळे प्रवाशांना मणक्याच्या आजारांसह इतर आजाराला सामोरे जावे लागत आहे.
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथून होनाळा, बारूळ, जवळगा (मे), वानेगाव, वडगाव देव, सलगरादी, किलजरून हा रस्ता पुढे जातो. या मार्गावरील जवळपास २५ ते ३० किमी अंतरावरात दर पाच, दहा फुटांवर खड्डे पडल्याचे दिसून येते. काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याची माती वर आली असून, वाहनचालक, दुचाकी चालकांना वाहने चालविताना ‘नजर हटी दुर्घटना घडी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून ही दुरवस्था कायम असून, प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.
दर्शनासाठी गर्दी
काक्रंबा-किलज मार्गावर तालुक्यातील जवळगा (मे) येथे जागृत देवस्थान मेसाईचे मंदिर आहे. येथे जिल्ह्यासह परजिल्ह्यातील भाविकांची देवी दर्शन, नवसपूर्ती कऱण्यासाठी नेहमीच मोठी गर्दी असते. त्यामुळे या मार्गावर भाविकांच्या वाहनाची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह भाविकांनाही रस्त्याच्या दुरवस्थेचा त्रास सहन करावा लागत आहे.
पूलही खचला
जवळगा (मे) मार्गावरी होनाळा गवानजीक असलेला नदीचा पूलही खचला असून, या पुलावर मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा उतराला असून, तो बुजविण्यात आला नसल्याने रात्री या खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे यातून अपघात घडत आहेत.
रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने, वाहने खिळखिळी होत आहेत. अनेकांना पाठीचा, मणक्याच्या त्रास उद्भवत आहे. सध्या शेतकऱ्यांची ऊसतोड सुरू असून, या मार्गावर ऊस वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः खड्डे बुजवावे लागत आहेत. अनेक वर्षांपासून रस्त्याची ही दुरवस्था कायम असताना प्रशासन मात्र याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे.
- अमोल जेटीथोर, ग्रामस्थ, वाणेगाव