तामलवाडी : कोरोना महामारीच्या संकटामुळे शाळा बंद असल्या तरी तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी येथे शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात विविध वृक्षांची लागवड केल्याने हिरवळीने परिसर बहरल्याचे दिसत आहे.
गोंधळवाडी जिल्हा परिषद शाळेसाठी गावाच्या माळरानावर नवीन इमारत बांधण्यात आली असून, येथे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून शाळेसमोरील मैदानात विविध रोपाची लागवड करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून शाळा कुलूप बंद असली तरी वेळच्या वेळी पाणी घालून शिक्षक व विद्यार्थ्यांंनी लागवड केलेल्या या रोपाचे चांगले संगोपन केले. त्यामुळे शाळेच्या परिसरात सर्वत्र हिरवळ पसरल्याचे दिसत आहे. शाळा बंद असली तरी झाडांना पाणी देण्याचे काम विद्यार्थी अविरतपणे करत आहेत.
शनिवारी जागतिक पर्यावरण दिनी सुरतगावचे केंद्रप्रमुख रमाकांत वाघचौरे यांनी भेट देऊन जोपासलेल्या वृक्ष लागवडीची पाहणी करून शिक्षक, विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याकामी बाशेवाड, लालासाहेब मगर, शंकर राऊत, जयमाला वटणे, तोटावार आदींनी पुढाकार घेतला.