वाशी (जि. उस्मानाबाद) : डिझेल भरण्यासाठी निघालेला टेम्पो व ट्रकची जाराची धडक होऊन झालेल्या अपघातात टेम्पोतील वीट कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ३ जून रोजी औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील पार्डी फाट्यानजीक दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
पार्डी येथील विना क्रमांकाचा वीट वाहतूक करणारा टेम्पो विटा घेऊन डिझेल भरण्यासाठी पार्डी येथून पेट्रोलपंपाकडे महामार्गाच्या विरुध्द बाजूने साईडपट्टीवरून जात होता. यावेळी बीडकडे भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच १२/ एचडी़ ३६११) या टेम्पोला जोराची धडक बसली. या अपघातात टेम्पोमधील वीट कामगार आकाश अनिल सपकाळ (वय २० रा. पार्डी) यांचा जागीच मृत्यू झाला तर संतोष अच्युत मस्के (वय १९), रोहित लक्ष्मण मस्के (वय १७) आणि अविनाश दत्तात्रय कोळी (वय २२) हे किरकोळ जखमी झाले.
वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी डॉ. महावीर कोटेचा यांनी आकाश सपकाळ यास मृत घोषित केले तर इतर जखमींवर उपचार करून घरी सोडण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आजीनाथ काशिद यांनी पोलिस उपनिरीक्षक पवन निंबाळकर, हवालदार मोहसिन पठाण यांना घटनास्थळाकडे पाठविले.
चौकट...........
रस्ता नसल्यामुळे विरुध्द बाजूने वाहतूक
औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर अनेक ठिकाणी पेट्रोलपंप आहेत. मात्र, या पंपाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे अनेक वाहनचालक महामार्गाच्या विरुध्द बाजूने जाऊन इंधन भरतात़ त्यामुळे पेट्रोल पंपानजीकच रस्ता केल्यास असे अपघात होणार नाहीत, अशा प्रतिक्रिया पार्डी येथील वीट उद्योग व्यावसायिकातून व्यक्त होत आहेत.
ट्रक चालकाला नागरिकांकडून चोप
धडक एवढी भीषण होती की, यात टेम्पोचे मोठे नुकसान झाले. तसेच ट्रकची समोरील दोन्ही चाके निखळून बाजूला पडली. अपघात घडताच ट्रक चालक उध्दव ज्ञानदेव कारगुडे (रा. पाली, जि. बीड) यास तेथील उपस्थित नागरिकांनी चांगलाच चोप दिला. पार्डीच्या पोलीस पाटलांनी त्याला नागरिकाच्या तावडीतून सोडवून वाशी पोलिसांच्या स्वाधीन केले. सदरील ट्रकचालक नशेत होता, असे उपस्थित नागरिकांनी सांगितले.