येडशी (उस्मानाबाद) : औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील येडशी गावानजीक रात्री ७ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगातील ट्रकने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. या अपघातात तिघे ठार झाले, तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींवर उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़
उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील काही कामगार गुरूवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरमध्ये कडबा घेऊन गावाकडे निघाले होते़ हे ट्रॅक्टर (क्र. एमएच २५/ एच ६९९०) गावाजवळील महामार्गावर आल्यानंतर येरमाळ्याकडून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (क्ऱए़पी़१६-टी़जी़२०८८) ट्रॅक्टरला जोराची धडक दिली़ ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरच्या हेडचे दोन तुकडे झाले़ या अपघातात ट्रॅक्टरमधील समाधान राजेंद्र ठाकर (२९), विशाल बापू जगताप (२१) हे दोघे जागीच ठार झाले़ तर संतोष विठोबा नागटिळक (४०) हे जिल्हा रूग्णालयात मयत झाले़ या अपघातात जयदेव मारूती बेद्रे (२९), दीपक कुंडलीक नागटिळक (२२) व सुनिल विठोबा नागटिळक (३२) हे तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़
१०८ अभावी गैरसोययेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका मागील काही दिवसांपासून बंद आहे़ त्यामुळे गुरूवारी रात्री झालेल्या अपघातानंतर इतर ठिकाणच्या रूग्णवाहिका बोलवाव्या लागल्या़ तर एका जखमीला खासगी वाहनातून उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले़