धाराशिव : जिल्ह्यातील आठही तालुक्यांना जानेवारीतच टंचाईच्या ‘झळा’ सहन कराव्या लागत आहेत. तुळजापूर अन् कळंब तालुक्यांतील गावे टंचाईने सर्वाधिक ‘बेजार’ आहेत. जिल्ह्यात सध्या एकूण ७८ विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान जाणवणाऱ्या टंचाईवर मात करण्यासाठी १,८८८ उपाययाेजनांची आखणी केली आहे. त्यासाठी २३ काेटी ७ लाख ५५ हजारांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे.
जानेवारी ते मार्च या कालावधीत धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यांत टंचाईग्रस्त गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी जवळपास २५० टॅंकरची गरज भासणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जानेवारी महिन्यातच संभाव्य टंचाई कृती आराखडा आखला आहे. ज्या गावांच्या घशाला काेरड पडली आहे, अशांसाठी तातडीने उपाययाेजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
दाेन तालुक्यांची पाण्यासाठी भटकंती...धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर आणि कळंब तालुक्यांची घाेटभर पाण्यासाठी हिवाळ्यातच भटकंती सुरू झाली आहे. जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांपैकी सर्वाधिक तुळजापूर - ३२ आणि कळंब तालुक्यात २८ विंधन विहिरींचे अधिग्रहण केले आहे. वाशी-परंडा प्रत्येकी १, धाराशिव-भूम प्रत्येकी २, लाेहारा - ८ आणि उमरगा तालुका ४ विंधन विहिरींचे अधिग्रहण केले आहे.
टंचाई निवाराणासाठी १ हजार ८८८ याेजना...टंचाईग्रस्त गावांसाठी नऊ प्रकारच्या उपाययाेजनांची आखणी केली असून, यात बुडक्या घेणे - ७, विहिरीतील गाळ काढणे - २७, खासगी विहिरींचे अधिग्रहण - १ हजार ८८, टॅंकर, बैलगाडीने पाणीपुरवठा - ४९३, प्रगतिपथावरील पाणीपुरवठा याेजनांची कामे पूर्ण करणे - ०, नळयाेजनेची दुरुस्ती - १, विंधन विहिरींची दुरुस्ती - ४६, नवीन विंधन विहिरी, कूपनलिका - १८१ आणि तात्पुरत्या ४५ पूरक नळयाेजनांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील टंचाईवर २३ काेटींचा हाेईल खर्च...जिल्ह्यातील संभाव्य टंचाई दूर करण्यासाठी धाराशिव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने २३ काेटी ७ लाख ५५ हजारांचा खर्च केला जाणार आहे. यात खासगी विहिरींच्या अधिग्रहणासाठी - ५ काेटी ३६ लाख ३ हजार; टँकर, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ९ काेटी ६६ लाख १ हजार; नवीन विंधन विहिरी घेणे, कूपनलिकेसाठी २ काेटी ५२ लाख ५० हजार आणि तात्पुरत्या पूरक नळयाेजनांसाठी ४ काेटी ५६ लाख ९१ हजारांची तरतूद आहे.