औरंगाबाद : आई राजा उदो उदो... या गजरात, संबळाच्या वाद्यात व भंडाऱ्याची उधळण करीत श्री तुळजाभवानी देवीच्या आठदिवसीय मंचकी निद्रेस शुक्रवारी सायंकाळी पारंपारिक पद्धतीने प्रारंभ झाला.
मंचकी निद्रेच्या शेजघराचे मानकरी पलंगे घराण्याकउून मंचकी निद्रेचा पलंग स्वच्छ धुऊन काढण्यात आला. यानंतर पलंगावरील गाद्या मंदिरातील श्री गणेश ओवरीत ठेवण्यात आल्या. याठिकाणी मोजक्याच सुवासिनींच्या उपस्थितीत गाद्यातील कापूस निवडला गेला व त्यानंतर गाद्या भरण्याचे काम अच्युत कुलकर्णी यांनी केले. यानंतर सेवेकरी पलंगे यांनी तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेच्या पलंगास नवार बांधून देवीच्या मंचकी निद्रेचा पलंग तयार केला. त्यावर गाद्या टाकून देवीची मुख्य चलमुर्ती सिंहासनावरून हलवून मंचकी निद्रेच्या शेजघरातील चांदीच्या पलंगावर निद्रीस्त करण्यात आली. यानंतर पलंगावरती देवीची यथासांग पूजा व धुपारती झाली.
तुळजाभवानी देवीची आठ दिवसीय मंचकी निद्रा पूर्ण झाल्यानंतर दि. १७ ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती पहाटे सिंहासनावर विराजमान होऊन दुपारी १२ वाजता सिंह गाभाऱ्यात घटस्थापना होईल.