धाराशिव : तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी लिलावात सुमारे साडेआठ कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतर तीन महिने उलटत असतानाही गुन्हा दाखल झालेला नाही. यामुळे हिंदू जनजागृती समितीने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर सुनावणी घेताना छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने धाराशिव जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना २ सप्टेंबरला हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
१९९१ ते २००९ या कालावधीत तुळजाभवानी मंदिरातील दानपेट्यांचा लिलाव केला गेला होता. लिलाव घेणाऱ्यांचे हितसंबंध जोपासणारे निकष लावून याद्वारे ८ कोटी ४५ लाख ९७ हजार रुपयांचा घोटाळा करण्यात आला होता. २०११ साली तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या प्रकाराची सीआयडी चौकशी लावली होती. त्याचा अहवाल सादर झाल्यानंतर कोणतीही कार्यवाही केली गेली नाही. यामुळे हिंदू जनजागृती समितीने २०१५ साली अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली. तिचा अंतिम निकाल ९ मे २०२४ रोजी देण्यात आला.
या घोटाळ्यात सहभागी सर्व दोषींवर विनाविलंब गुन्हा दाखल करण्याचा आदेश खंडपीठाने दिला होता. मात्र, दोन महिने उलटल्यानंतरही गुन्हे दाखल होत नसल्याने समितीने अवमान याचिका दाखल केली आहे. यावर न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे यांनी सुनावणी घेऊन धाराशिवच्या जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना २ सप्टेंबरला न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचा आदेश दिला असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट, तसेच तुळजापूरचे किशोर गंगणे यांनी दिली.
मुख्य सचिवांनाही नोटीसतुळजाभवानी मंदिरातील दानपेटी लिलाव घोटाळ्याच्या या प्रकरणात सध्या गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभार पाहत असलेल्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनाही खंडपीठाने अवमाननेची नोटीस बजावली आहे.
म्हणून गुन्ह्यात विलंब नकोसध्या न्यायालयात अवमान याचिकेवर सुनावणी सुरू असल्याचे कारण सांगत घोटाळा प्रकरणात गुन्हा नोंदवण्याचे काम थांबवण्याची आवश्यकता नाही, अशी सूचनाही खंडपीठाने केली आहे.