तुळजापूर: तुळजाभवानी मंदिर परिसरात भक्तांसाठी लावण्यात आलेल्या ड्रेसकोडबाबतच्या सूचनांबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असतानाच, अवघ्या काही तासांत हा निर्णय मागे घेण्यात आला. 'तुळजाभवानी संस्थानच्या परिसरात, महाद्वारावर भाविकांनी अंग प्रदर्शक, उत्तेजक,असभ्य,अशोभनिय वस्त्रधारी तसेच हाफ पँन्ट, बर्मुडाधारीना मंदिरात प्रवेश नाही, कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा', असे फलक तुळजाभवानी संस्थानच्या नावे लावण्यात आले होते. मात्र काही तासांतच ड्रेसकोडबाबतचे निर्णय मागे घेण्यात आला. तसा फलक आता लावण्यात आलेचे सांगण्यात येत आहे.
तहसिलदार, जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
तुळजापुर शहरातील काही पुजारी बांधवानी तहसिलदार तथा व्यवस्थापक सौदागर तांदळे, धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे यांचा आज सत्कार केला. परंतु असे बँनर लावण्याचे आदेश मंदिर प्रशासनाने दिलेच नाहीत किंवा तसा ठराव देखील झालेला नाही, असे तुळजाभवानी संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी म्हटले. त्यामुळे हे बॅनर का व कुणी लावले अशा चर्चा सुरू होत्या. ड्रेसकोडबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेच नाहीत, असे खुद्द जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनीच सांगितले. मी काल, परवाच चार्ज घेतलाय. तत्कालीन तहसिलदार तथा व्यवस्थापकांनी हे फलक तयार केले होते अस वाटतंय. हे फलक काढण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. संबधिताला नोटीसही देण्यात आलेली आहे. माझा सत्कार कशासाठी केलाय हे मला माहीतच नाही. मी तेथे गेलो तेव्हा मला फलक लावलेले दिसले. मला या संदर्भातील कागदपत्रे दिसत नाहीत. मला संबंधित फाइल तपासून पाहाव्या लागतील. त्यानंतरच यातील नेमके सत्य स्पष्ट होणार आहे, असे तहसिलदार आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक सौदागर तांदळे यांनी म्हटले आहे. या प्रतिक्रियेनंतर रात्री तहसिलदार तांदळे यांनी अशा प्रकारचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नसल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.
लावलेल्या फलकावर काय होत्या सूचना?
तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येताना भक्तांनी कशा प्रकारचे कपडे घालावेत याबाबत मार्गदर्शन करणारे सूचनापलक मंदिर परिसरात लावण्यात आले होते. अंगप्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी, तसेच हाफ पँट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही. कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा, असा मजकूर या फलकावर लिहिण्यात आला होता.