तुळजापूर (जि.धाराशिव) : श्री तुळजाभवानी देवीची आठ दिवसांची मंचकी घोरनिद्रा शुक्रवारपासून सुरु होत असून, यानंतर लागलीच शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे. अख्यायिकेनुसार महिषासुराशी युद्धावर जाण्यापूर्वी देवी ही आठ दिवसांच्या मंचकी निद्रेवर जाते. या कालावधीत भाविकांना केवळ मंचकाचे दर्शन घ्यावे लागते.
श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला ६ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. शुक्रवारी सायंकाळी पंचामृत अभिषेक पूजा झाल्यानंतर तुळजाभवानीच्या घोरनिद्रेस प्रारंभ होईल. ही घोरनिद्रा १५ ऑक्टोबरपर्यंत चालेल. १५ रोजी पहाटे देवीची पूर्ववत सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाईल. या प्रतिष्ठापनेनंतर विशेष पंचामृत अभिषेक पूजा होऊन देवी भक्तांना दर्शनासाठी सोडण्यात येईल. यानंतर पहाटे सहा वाजता अभिषेक घाट होऊन नित्योपचार पंचामृत अभिषेक होतील. नैवेद्य, धुपारती, अंगारा व अलंकार महापूजा होऊन मंदिर संस्थानचे अध्यक्षांच्या हस्ते दुपारी बारा वाजता सिंह गाभाऱ्यात घटस्थापना होणार आहे.
अख्यायिकेनुसार महिषासुराला भगवान शंकराचे रक्तबीज वरदान लाभल्याने तो उन्मादी बनतो. देव-देवतांचा, ऋषी-मुनींचा छळ मांडतो. यामुळे ५२ देव एकत्र येऊन महिषासुराचा नायनाट करण्यासाठी देवीची निवड करतात व तिला आपली शक्ती प्रदान करतात. देवी महिषासुराशी युद्धावर जाण्यापूर्वी आठ दिवसांची मंचकी निद्र घेते. त्यालाच घोरनिद्रा असेही म्हणतात. या निद्रेनंतर नऊ दिवस देवी महिषासुराशी युद्ध करते व त्याला शरण आणते. यानंतर विजयादशमी पासून पुन्हा देवी कोजागिरी पोर्णिमेपर्यंत पाच दिवसांची निद्रा घेते. त्यास श्रमनिद्रा असे म्हटले गेले आहे.