तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : ‘आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे’चा गजर करीत व भंडाऱ्याची उधळण करून शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रपूर्व मंचकी निद्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी संभळाचा निनाद मंदिरभर घुमला.
श्री तुळजाभवानी माता ही पूर्ण शक्तीपीठ असलेली कुलदेवता. तुळजाभवानी देवीचे इतर देवी-देवतांपेक्षा वेगळे महत्त्व आहे. कारण, तुळजाभवानीची एकमेव मूर्ती ही चलमूर्ती म्हणून ओळखली जाते. देवीच्या वर्षातून तीन वेळा निद्रा होतात. या निद्रा २१ दिवस चालतात. यात पहिली निद्रा पौष महिन्यात शाकंबरी नवरात्रपूर्वी असते. ही निद्रा आठ दिवस चालते. त्यानंतर शारदीय नवरात्रापूर्वी आठ दिवस निद्रा चालते. नवरात्र संपल्यानंतर परत अश्विनी पोर्णिमेपर्यंत पाच दिवस निद्रा चालते. अशाप्रकारे मंचकी निद्रा घेणारी एकमेव देवी म्हणजे श्री तुळजाभवानी माता.
या देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव आता सुरू होत आहे. तत्पूर्वी शनिवारी पहाटे चरणतीर्थ, सकाळी अभिषेक घाट होऊन पंचामृत अभिषेक पार पडले. यानंतर महंत भोपीपुजारी यांनी देवीची अलंकार पूजा मांडली. धुपारती, अंगारा, नैवेद्य हे नित्योपचार विधी पार पडले. सायंकाळी भोपीपुजारी बांधवांनी १०८ वस्त्राची देवी मूर्तीस दिंड घालून ‘ आई राजा उदे उदे’चा जयघोष करण्यात आला. भंडाऱ्याची उधळण व संभळाचा निनाद करीत देवीच्या मूर्तीस मंचकावर निद्रेसाठी आणण्यात आले. येथूनच तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला. यावेळी देवीचे महंत, भोपीपुजारी, सेवेकरी, पुजारी, तहसीलदार योगिता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, सिद्धेश्वर इंतुले यांच्यासह भाविक उपस्थित होते.