उस्मानाबाद : स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेले खाद्यतेलाचे चढ-उतार होणारे दर घराघरातील चिंतेचा विषय बनलेला असतानाच या आठवड्यात तूर डाळही पाच रुपयांनी महागली असून तूर डाळीचे दर ९४ रुपयांहून ९९ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे मूग डाळ व उडीद डाळही महागली आहे.
तुरीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे तूरडाळीच्या दरातही वाढ होऊ लागली आहे. मागील आठवड्यात ९४ रुपये किलोने विक्री होणारी तूरडाळ आता ९९ रुपयांवर जाऊन ठेपली आहे. मूग डाळ व उडीद डाळीच्या दरात वाढ झाली आहे. मूग डाळ ९५ ते ९६, उडीद डाळ ९३, हरभरा डाळ ६५ ते ६८ रुपये, मसूर डाळ ७० ते ७२ रुपये किलोने विक्री होत आहे. शिवाय, खाद्यतेलाच्या दरातही दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोयाबीन तेल १२५ रुपये, सूर्यफूल तेल १३५ ते १३८ रुपये, शेंगदाणा तेल १५५ ते १६० रुपये किलो, पामतेल १०८ ते ११० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. डाळींचे दर आणखीन वाढण्याची शक्यता असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
चौकटी...
कांद्याचे दर स्थिर...
बाजारात नवीन कांदा आल्याने कांद्याचे दर स्थिर आहेत. कांदा ४० ते ५० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. बटाटा, वांगी १० ते १५ रुपये, पत्ताकोबी, फ्लॉवर १० रुपये, भेंडी, दोडका ३० रुपये, कारले ४०, गवार, शेवगा ५० ते ६० रुपये किलोने विक्री होत आहे.
सफरचंद महागले
बाजारात सफरचंदाची आवक कमी असल्याने सफरचंदाचे दर वाढले आहेत. सफरचंद १४० ते १६० रुपये किलोने विक्री होत आहेत. संत्रा, चिकू ५० रुपये, द्राक्षे लागल्याने ६० ते ७० रुपये किलाे दराने विक्री होत आहे.
टोमॅटो ५ रुपये
यंदा अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. परिणामी, टोमॅटोचे उत्पादन वाढले आहेत. बाजारात मागणीच्या तुलनेत आवक अधिक असल्याने टोमॅटो ५ ते १० रुपये किलोने विक्री होत आहे.त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय.
तीन चार महिन्यापासून तेलाचे दर वाढत आहेत. आता डाळीचे दरातही वाढ होत आहे. त्याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. पालेभाज्या स्वस्त असल्याने काही अंशी दिलासा मिळत आहे.
- समाधान सरवदे, ग्राहक
मागील काही दिवसापासून वातावरणात गारठा वाढला आहे. त्यामुळे संत्रा, खरबूज, द्राक्षाला मागणी कमी आहे. सफरचंदाची आवक कमी असल्याने सफरचंद महागले आहे.
- समीर बागवान, फळविक्रेते
खाद्यतेलाचे दरात वाढ होत आहे. तुरीचा दर वाढला असल्याने तूर डाळीचा दर वाढला आहे. तूर डाळ ९९ रुपये किलोने विक्री होत आहे. इतर डाळीच्या किमतीतही काही अंशी वाढ झाली आहे.
- अमित गांधी, किराणा व्यावसायिक.