धाराशिव : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून, त्यास समर्थन देण्यासाठी मंगळवारी धाराशिव तालुक्यातील तेर येथे चोघांनी बेमुदत उपोषण सुरू केले. याच वेयी २० युवकांनी मुंडन करीत शासनाचा निषेध नोंदविला.
जरांगे - पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनास दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. जिल्ह्यात गावोगावी उपोषण, रस्ता रोको, गाव बंद ठेऊन आंदोलने केली जात आहेत. या अनुषंगाने तेर येथेही सोमवारी बैठक घेऊन मंगळवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संजय जाधव, पांडुरंग मुळे, सोमनाथ आबदारे व गणेश देशमुख यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होणाऱ्या नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असे आंदोलकांनी स्पष्ट केले. उपोषणस्थळी मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याकडे राज्य सरकार कानाडोळा करीत असल्याचा आरोप करीत बाबूराव नाईकवाडी, आप्पासाहेब चौगुले, बाळासाहेब कानाडे, हिजू काझी, धनंजय आंधळे, शंकर थोडसरे, दत्ता वडवले, सोमनाथ अकुशे, किरण नाईकवाडी, बापू नाईकवाडी, आकाश नाईकवाडी, विठ्ठल कदम, सौरभ जाधव, सुधीर मोरे, गणेश चौगुले यांनी मुंडन करीत राज्य शासनाचा निषेध नोंदविला. उपोषणस्थळी दिवसभर तेर व परिसरातील अनेक गावातील नागरिकांनी उपोषणार्थींची भेट घेत आंदोलनास पाठिंबा दर्शविला.