परंड्यात धाडशी चाेरी-श्वान पथक, ठेस तज्ज्ञांना केले पाचारण
परंडा : चाकूचा धाक दाखवून अज्ञात चाेरट्यांनी साेन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास शहराबाहेरील करमाळा रस्त्यावरील काशीमबाग येथे घडली. घटनेची माहिती मिळताच, पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेत श्वान पथक, तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करून तपास सुरू केला.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, परंडा शहराबाहेरील करमाळा रस्त्यावर काशिमबाग येथे शेतात सुरेश घाडगे हे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास साधारपणे पंचविशीतील सहा चाेरटे त्यांच्या घराच्या पश्चिम बाजूकडून पाइपचा आधार घेऊन वर चढले. वरील मजल्यावर सुरेश घाडगे झाेपलेल्या खाेलीस बाहेरून कडी लावली. यानंतर, जिन्याच्या साहाय्याने त्यांनी तळमजल्यावर प्रवेश केला. तेथे घाडगे यांचे सासरे सुरेश कदम, त्यांच्या माताेश्री, घाडगे यांची मुलगी अंजली आणि मुलगा राेहित झाेपलेले हाेते. चाेरट्यांच्या पायाच्या आवाजाने यातील काहींना जाग आली असता, त्यांनी चाकूचा धाक दाखवून घरातील साेन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, कर्णफुले, चांदीचे पैंजण दाेन जाेड, तसेच राेख ६ हजार ३४० रुपये असा एकूण २ लाख ६६ हजार ३४० रुपयांचा ऐवज लंपास केला. यानंतर, घाडगे यांचे सासरे कदम यांच्या पत्नी व त्यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र व कर्णफुले जबरदस्तीने काढण्याच्या प्रयत्नात असतानाच, गस्तीवरील पाेलिसांच्या गाडीचे सायरन वाजले. त्यामुळे चाेरट्यांनी ऐवज घेऊन पाेबारा केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाेलीस निरीक्षक सुनील गिड्डे, उपनिरीक्षक सासणे, माेमीन, बनसाेडे यांनी पथकासह भेट देऊन पाहणी केली. यानंतर, उपविभागीय पाेलीस अधिकारी डाॅ.विशाल खांबे यांनीही आपल्या पथकासह भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या.
चाैकट....
चाेरून नेलेली बॅटरी शेतात सापडली...
चाेरट्यांचा माग शाेधण्यासाठी पाेलिसांनी श्वान पथक, तसेच ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण केले हाेते. यावेळी चाेरट्यांनी दारे बंद करण्यासाठी वापरलेल्या दाेरीचा श्वानास वास देण्यात आला. याच्या आधारे श्वान शहराच्या उत्तरेस असलेल्या ४०० केव्हीए केंद्राच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शेतात पाेहाेचले. चाेरट्यांनी पळविलेली बॅटरी या ठिकाणी आढळून आली. यापुढे मात्र श्वान गेले नाही.