(फोटो : रसूल तांबोळी २४)
रसूल तांबोळी
मस्सा (खं) : कळंब तालुक्यातील मस्सा (खं) येथे एक युनानी आणि एक उपकेंद्र असे सरकारी आरोग्यसेवा देणारे दोन दवाखाने आहेत, परंतु ना डॉक्टर कार्यरत आहेत, ना इतर पुरेसे कर्मचारी. त्यामुळे हे दोन्ही दवाखाने केवळ शोभेची वस्तू बनले असून, येथील रुग्णांना उपचारासाठी बार्शी किंवा कळंबला जावे लागत आहे.
मस्सा (खं). हे कळंब तालुक्यातील मोठ्या गावांपैकी एक. गावाची लोकसंख्या सहा हजारांपार असून, कुटुंबाची संख्या एक हजारापेक्षा जास्त आहे. खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या गावात व्यापार, उद्योगही बऱ्यापैकी चालतो, शिवाय बँक, शाळा, बाजार आदी सुविधा असल्याने पंचक्रोशीतील गावांचा मस्सा गावाशी नित्य संबंध येतो. अशा या महत्त्वाच्या गावातील नागरिकांना आधार देईल, अशी आरोग्य यंत्रणा मात्र सद्यस्थितीत कार्यान्वित नाही. गावात जिल्हा परिषद आरोग्य विभाग संचलित एक युनानी दवाखाना आहे. याशिवाय याच विभागाच्या अखत्यारित येणारे आरोग्य उपकेंद्र आहे. यातील युनानी दवाखान्यात एक युनानी डॉक्टर, एक औषध निर्माता, एक दाया व एक परिचर अशी पाच पदे मंजूर आहेत, परंतु सध्या या ठिकाणी केवळ परिचर कार्यरत आहेत. यामुळे ना डॉक्टर ना कंपाउंडर, अशी स्थिती असलेल्या दवाखान्यात लोकांनी कसे उपचार मिळणार, असा प्रश्न आहे, शिवाय औषधाचा तुटवडा तो वेगळाच.
उपकेंद्राची स्थतीही यापेक्षा वेगळी नाही. तालुक्यात इतर सर्व उपकेंद्रात सीएचओ नियुक्त केलेले असताना येथे मात्र ‘युनानी’चा दाखला देत, बीएमएम सीएचओ नियुक्त केलेले नाहीत. त्यामुळे एक आरोग्यसेवक व सेविका यांच्यावरच या दवाखान्याची मदार आहे. एकूणच डॉक्टरच नसल्याने हे उपकेंद्रही केवळ लसीकरणापुरते उरले आहे. यामुळे येथे तत्काळ इतर उपकेंद्राप्रमाणे डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. दोन्ही दवाखान्यांसाठी स्वतंत्र इमारती असतानाही केवळ डॉक्टर नसल्याने त्या ‘असून अडचण’ अशा ठरत आहेत.
कोट.......
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र किंवा युनानी दवाखाना येथे एक नियमित कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध व्हावा, यासाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला आहे, परंतु वरिष्ठांनी याची अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना आरोग्यसेवेच्या अडचणी येत आहेत.
- प्रा. राजश्री वरपे, सरपंच
गावातील वयोवृद्धांना दमा, सर्दी, खोकला, ताप, गुडघेदुखी, कंबरदुखी, मान-पाठ दुखी यांसारखे अनेक आजार आहेत. यावरील गोळ्या मिळाव्यात, म्हणून आम्ही दवाखान्यात जातो, परंतु डॉक्टर व नर्स नसतात. म्हणून आमची तारांबळ होते. त्यामुळे आम्हाला बार्शी किंवा कळंबला जावे लागते.
- कौशल्या रामलिंग मोरे, ग्रामस्थ