नळदुर्ग ( उस्मानाबाद ), दि. 22 : मुंबईहून हैद्राबादकडे रसायनाचे बॅरेल वाहतूक करणारा ट्रक अचानक पेटल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती़ ही घटना शुक्रवारी दुपारी मुंबई- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील जळकोट (ता. तुळजापूर) शिवारात घडली़ असून, या घटनेत जवळपास ४० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे़
मुंबई येथून हैद्राबादकडे केमिकलचे ७५ बॅरेल घेऊन ट्रक (क्र. के़ए़५६ - ००८९) निघाला होता़ शुक्रवारी सकाळी तुळजापूर तालुक्यातील जळकोट शिवारात आल्यानंतर ट्रक अचानक पाठीमागून पेटला़ पाहता पाहता पूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने धुराचे लोट उठले होते़ धुराचे लोट इतके मोठे होते की आठ ते दहा किलोमीटर अंतरावरून दिसत होते़ ट्रकने पेट घेतल्यानंतर क्लिनर, चालकाने ट्रक सोडून घटनास्थळावरून दूर पळ काढला़ घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी येथील अग्निशमन दलाची गाडी बोलावून घेतली़. अग्निशमन दलाचे वाहन आले असले तरी या पथकाला आग विझविण्यात अपेक्षित यश आले नाही. यामुळे अवघा ट्रक या घटनेत जळून खाक झाला़ महामार्गावरच ट्रक पेटल्याने दोन तास वाहतूक ठप्प होती़. आग आटोक्यात येईपर्यंत वाहने मूर्टा, लोहगाव मार्गाने वळविण्यात आली होती़