अनुसूचित जाती, नवबौध्द घटकातील १० वी ते व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करीत असतात. मात्र, या ठिकाणी प्रवेश फुल्ल झाल्यानंतर चांगले गुण असलेले विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केला असता, प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना निवास व भोजनासाठी शासनस्तरावरून भत्ता दिला जात असतो. या भत्त्याच्या आधारावरच विद्यार्थी हातउसने पैसे घेऊन निवास व भोजनाची व्यवस्था करीत असतात. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात ७१४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ५१० विद्यार्थ्यांच्या खात्यावर १ कोटी ८७ लाख ९ हजार रुपयांची रक्कम वर्ग झालेली आहे, तर अद्यापही २०४ विद्यार्थी लाभापासून वंचित राहिले आहेत. योजनेचा लाभ कधी मिळतो, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
चौकट...
२०१९-२० या वर्षासाठी सहायक समाजकल्याण विभागाकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ७१० विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. हे शैक्षणिक वर्ष उलटून गेल्यानंतर यातील ५१० विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे, तर शैक्षणिक वर्ष संपून दोन वर्षाचा कालावधी लोटला तरी २०४ विद्यार्थी निर्वाह भत्त्यापासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांसाठी ६५ लाख रुपयांचा निधी लागणार असून, वरिष्ठ स्तरावर मागणी केली असल्याचे सहायक समाजकल्याण कार्यालयातून सांगण्यात आले.