उस्मानाबाद : शहरातील एका तरुणास जातपंचायतीच्या माध्यमातून लावलेल्या दंडाच्या वसुलीसाठी त्रास देऊन त्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जातपंचायतीचे पंच व पुढाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील पुढारी असलेल्या दोन आरोपींना गुरुवारी रात्री गुन्हे शाखेने ढोकीच्या पारधी पेढीवरून गजाआड केले. उर्वरित आरोपींचाही शोध पोलीस घेत आहेत.
उस्मानाबादच्या संत गोरोबा काका नगरात वास्तव्यास असलेल्या सोमनाथ काळे या तरुणास जातपंचायतीचा दंड लावण्यात आला होता. या दंडाची रक्कम भरली गेली नसल्याने पुन्हा पंचायत भरवून पंच व समाजातील पुढाऱ्यांनी या तरुणास विष्ठा खाण्यास भाग पाडले होते, तसेच त्याच्या पत्नीस नग्न करून मारहाण करण्यात आली होती. यामुळे सोमनाथ काळे याने विष प्राशन करून आत्महत्या केली.
६ पंचांसह २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखलयाप्रकरणी त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून राजा चव्हाण, मोतीराम काळे, भागवत पवार, पापा शिंदे, रामदास चव्हाण, नाना काळे या सहा पंचांसह इतर २५ ते ३० जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आनंदनगर ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निवा जैन यांनी विशेष पथकाच्या माध्यमातून आरोपींना तातडीने पकडण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन घाडगे यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक शैलेश पवार यांच्या पथकाने माहिती काढून ढोकी येथील राजेशनगर पारधी पेढीवर लपलेल्या पुढारी दादा उद्धव चव्हाण, कालिदास महादू काळे या आरोपींना गजाआड केले आहे. तपासासाठी या दोघांनाही शुक्रवारी आनंदनगर ठाण्याच्या हवाली करण्यात आले.
हेही वाचा - 'दंड भर नाहीतर घृणास्पद शिक्षा करू'; जात पंचायतीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
संतापजनक ! जात पंचायतीने विष्ठा खाण्यास पाडले भाग, महिलेस केले नग्न