शनिवारी पहाटेच्या सुमारास तेलंगणा राज्यातील भाविक कारव्दारे औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरून शिर्डीकडे जात असताना तालुक्यातील औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील इंदापूर फाट्यानजीकच्या वळणावर रोडलगत बसलेल्या अज्ञात चोरट्यांनी काहीतरी वस्तू भरधाव कारच्या समोर अचानक टाकल्याने कारचालकाचा ताबा सुटून कार खड्ड्यांत जाऊन पलटी झाली होती़ यामध्ये कारमधील पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत़ अपघात झाल्याबरोबर मदतीच्या बहाण्याने अज्ञात लुटारू कारजवळ गेले व जखमी अवस्थेतील महिलांच्या गळ्यातील तीन लाख रुपये सोन्याचे दागिने लुबाडून नेले़ दरम्यान, जखमींनी विरोध केला असता त्यांना मारहाणही चोरट्यांनी केली़ वाशी तालुक्यातील औरंगाबाद-सोलापूर महामार्गासह शिर्डीकडे जाणा-या मार्गावर अज्ञात चोरट्यांकडून वाहने अडवून तर कधी चालत्या ट्रकवर चढून लुटीचे प्रकार घडत आहेत़ सध्या मोठी कार अडवून अपघात घडवून त्यांना लुटण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे़ मध्यंतरी पंढरपूर येथील व्यापा-याची कार अडवून त्याला लुटले होते़ त्याचा तपास लावण्यात येरमाळा पोलिसांना यशही आले होते. अशाच प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत़ अनेक जण पोलिसात तक्रार दाखल न करता पोलिसांचा ससेमिरा व न्यायालयीन लढाई नको म्हणून पोलिसात जाण्याचे टाळत आहेत़ महामार्गावरील धाब्यावर काही ट्रकचालक थांबल्यास त्यांच्या ट्रकमधील काहीतरी सामान अथवा डिझेल चोरीस जात आहे़ पोलिसात चोरीच्या नोंदी होतात मात्र पुढे काय होते, याची माहिती आम नागरिकांना कळत नाही. शनिवारी पहाटेच्या सुमारास तेलंगणा राज्यातील भाविक कारमधून नवीन रामलू केतावत व त्यांचे कुटुंबीय शिडीस जात असताना पहाटेच्या सुमारास त्यांच्या भरधाव गाडीसमोर रस्त्याच्या कडेला खड्ड्यात बसलेल्या अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी कारच्या समोर काहीतरी वस्तू टाकली. यामुळे कारचालकाचा ताबा सुटून कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यामध्ये कारमधील जखमींना बाहेर काढत असताना अज्ञात चोरट्यांनी मारहाण करत त्यांच्याकडील दागदागिने लुटले. महामार्गावर वाहने थांबत असल्याचे दिसताच त्यांनी पळ काढला़ पोलिसात या घटनेचा गुन्हा नोंद झाला असून तपास पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्यावर सोपविण्यात आला आहे. त्यांनी चोरांच्या मुस्क्या आवळण्यासाठी दोन पथके निर्माण केली आहेत़ आम्ही लवकरच चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांना गजाआड करून असा विश्वास व्यक्त केला आहे़ सध्यातरी महामार्गावरून लहानमोठ्या वाहनचालकांसह दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी यामध्ये लक्ष घालून नागरिकांत विश्वासाचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे़
चोरट्यांच्या तपासासाठी दोन पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 4:29 AM