आंदाेलन- श्री तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी खुले करण्याची मागणी
तुळजापूर-श्री तुळजाभवानी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे, मंदिरातून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग निर्माण करावा आदी मागण्यांसाठी पुजारी, व्यापारी तसेच नागरिकांच्या वतीने मंगळवारी मंदिर प्रशासन कार्यालयाच्या परिसरात लाक्षणिक उपाेषण करण्यात आले.
साडेचार महिन्यापासून श्री तुळजाभवानी दर्शनासाठी बंद आहे. परिणामी भाविकांसह, शहरवासी, पुजारी, व्यापारी यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी मंदिर विश्वस्तांची बैठक घेऊन मंदिर उघडण्याचा प्रस्ताव मंजूर करून मुख्यमंत्र्यांकडे उघडण्यासाठी परवानगी घ्यावी, मंदिर परिसरातील विकासकामे व मंदिरातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग आदी कामे पुजारी मंडळाशी चर्चा करून तात्काळ सुरू करावित, मंदिर संस्थानमध्ये ‘व्हीआयपी’ पास, दर्शन पास, लाडू घोटाळा, सोने-चांदी तसेच मंदिराशी निगडित गैरप्रकाराच्या अनुषंगाने पुजाऱ्यांना बाजू मांडण्यासाठी विश्वस्तांच्या बैठकीत संधी द्यावी आदी मागण्यांसाठी पुजारी, व्यापारी तसेच नागरिकांच्यावतीने मंगळवारी मंदिर प्रशासन कार्यालयाच्या परिसरात लाक्षणिक उपाेषण करण्यात आले. तहसीलदार याेगिता काेल्हे यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. माजीमंत्री मधुकरराव चव्हाण, आ. राणा जगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी उपाेषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच त्यांच्या आंदाेलनास पाठिंबाही दिला. आंदाेलनामध्ये पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ यांचे अध्यक्ष, पदाधिकारी, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी, सेवेदार, फेरीवाले, नगरसेवक तसेच नागरिक सहभागी झाले हाेते.