उमरगा : भांडणाच्या रागातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. या घटनेनंतर आरोपीने थेट पोलीस ठाणे गाठून पोलिसांना खुनाची माहिती दिली. ही घटना उमरगा तालुक्यातील माडज (उस्मानाबाद) येथे आज पहाटेच्या सुमारास घडली.पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून खुनाचे कारण अद्याप पुढे आले नाही.
उमरगा तालुक्यातील माडज येथील मोहनसिंग महाबीरसिंग गहेरवार (वय-४८) हा भिगवण येथील एमआयडीसीमध्ये कामाला आहे़ सुटीनिमित्त तो गावाकडे आला होता़ त्याचा एक मुलगा आत्याकडे औरंगाबादला शिक्षणासाठी राहतो़ तर मुलीचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते़ मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मोहनसिंग महाबिरसिंग गहेरवार याचे त्याची पत्नी अनुसया गहेरवार (वय-४०) यांच्यासोबत कडाक्याचे भांडण झाले़ त्यावेळी रागाच्या भरात मोहनसिंग याने पत्नी अनुसया यांचा गळा आवळून खून केला़ घटनेनंतर थेट उमरगा पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली़
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पोलीस पाटील मारूती कुंभार यांच्याशी संपर्क साधला़ कुंभार यांनी मोहनसिंगच्या घराकडे धाव घेतली असता अनुसया या मृतावस्थेत आढळून आल्या़ त्यानंतर तुळजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप घुगे, सपोनि मंजुषा सानप, पोउपनि विशाल भोसले, सुभाष माने, विजयकुमार वाघ यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयत अनुसया यांचा भाऊ मोहनसिंग युवराजसिंग दिक्षित (रा़आलूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी रात्री मोहनसिंग महाबिरसिंग गहेरवार याच्याविरूध्द उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
वडिलांचा दीर्घ आजाराने मृत्यूमोहनसिंग याने पत्नीचा गळा दाबून खून केला़ त्याच कालावधीत त्याचे वडील महाबिरसिंग गहेरवार (वय-७५) यांचा पक्षाघाताच्या दीर्घ आजाराने मृत्यू झाला़ वडिलांचे निधन झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहनसिंगने गावातच राहणाऱ्या आत्याला दुचाकीवरून वडिलाच्या घरी आणून सोडले आणि दुसऱ्या वाहनाने त्याने उमरगा पोलीस ठाणे गाठले़
आरोपीने दिली कबुलीएकीकडे विवाहितेचा खून आणि दुसरीकडे त्यांच्या सासऱ्याचा मृत्यू या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे़ मोहनसिंग याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली आहे़ मात्र, खून नेमके कोणत्या कारणाने केला? याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले़