उस्मानाबाद : उमरगा तालुक्यात अवैधरित्या गावठी दारू तयार करणाऱ्या ११ अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाडी मारल्या. मागील दोन दिवसात या कारवाई करण्यात आल्या. यादरम्यान ९५ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ आहे.
उमरगा तालुका व परिसरात अवैधरित्या गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती़ उपायुक्त संगिता दरेकर यांच्या सूचनेनुसार, अधीक्षक बी़ एम़ बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा येथील दुय्यम निरीक्षक के़टी़ ढावरे, जे़ ए़ सिंग, एम़ ए़ शेख व कर्मचाऱ्यांनी मागील दोन दिवसात उमरगा तालुक्यातील दाबका शिवार, पळसगाव तांडा, मुरूम, आलूर व उमरगा शहर परिसरातील ११ गावठी दारू अड्ड्यांवर धडक कारवाई केली़ यावेळी ४७५ लिटर गावठी दारू, तीन हजार लिटर रसायनासह इतर ९५ हजार ५२४ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़
या प्रकरणी शाम विश्वनाथ गायकवाड, साहेबअली ईस्माईल उडचणे (दोघे रा़मुरूम), शिवराज रमेश गुंडगे, चन्नप्पा माऱ्याप्पा क्षीरसागर (दोघे रा़आलूर) यांच्या इतर आरोपींविरूध्द मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास दुय्यम निरीक्षक के़टी़ढावरे हे करीत आहेत़ ही कारवाई एम़एऩशेख, जे़ए़सिंग, के़टी़ ढावरे, नाना हाळंणकर, तुषार निर्लेकर, व्ही़ आय़ चव्हाण, ए़बी़बोंगाने, व्ही़ ए़ हजारे, व्ही़ सी़ कलमेल आदींनी केली.