उस्मानाबाद - शहरातील महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड स्टाफ को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीने नगरपालिकेकडून बांधकाम परवाना न घेता अनधिकृतरित्या इमारत व दुकानगाळे उभारले आहेत. बांधकामादरम्यान काम थांबविण्याची नोटीस देवूनही त्याला न जुमानता बांधकाम करणार्या पतसंस्थेचे हे अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस मुख्याधिकारी यांनी पतसंस्थेचे चेअरमन देवानंद सुरवसे यांना दिली आहे. बांधकाम न पाडल्यास फौजदारी कारवाईचा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे.
उस्मानाबाद शहरातील सर्व्हे क्रमांक १३४/१ मध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड स्टाफ को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीने आपल्या मालकीच्या जागेत संचालक मंडळाने नगरपालिकेचा बांधकाम परवाना न घेता एक मजली इमारतीचे बांधकाम आणि दुकानगाळे उभारण्याचे काम सुरू केले होते. हे काम अनधिकृत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पतसंस्थेचे सभासद बी. बी. जगदे व बालाजी आगवाने यांनी पालिकेकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार ५ मार्च २०२० रोजी पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी बांधकाम अनधिकृत असल्याने ते थांबविण्याची नोटीस दिली होती. या नोटीसीला चेअरमन देवानंद सुरवसे यांनी बांधकाम परवानगी मिळाल्याशिवाय नवीन बांधकाम करणार नाही, असे लेखी उत्तर दिले होते. मात्र त्यांनी पालिकेला अंधारात ठेवून इमारत व दुकानगाळ्यांचे काम सुरूच ठेवून ते पूर्णही केले. काम पूर्ण झाल्याबाबतची तक्रार पालिका प्रशासनाकडे आल्यानंतर मुख्याधिकार्यांनी शहानिशा करून पतसंस्थेचे चेअरमन सुरवसे यांना पूर्ण केलेले सर्व बांधकाम अनधिकृत असल्यामुळे ते एक महिन्याच्या आत पाडण्याची नोटीस दिली आहे. तसे न केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा व त्याचा खर्च वसूल करण्याचा इशाराही मुख्याधिकार्यांनी दिला आहे.
231220\23osm_1_23122020_41.jpg
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड स्टाफ को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीने बांधकाम परवाना नसताना उभारलेली हीच ती इमारत.