लोहारा ( उस्मानाबाद ) : लोहारा तालुक्यातील रूद्रवाडी येथे कुटुंबातील भांडण सोडवण्यासाठी आलेल्या भावकीतील काकांना काठीने झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे अडीच वाजता घडली. मारहाणीत आरोपीची पत्नी, आई, मुले असे सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लोहारा तालुक्यातील रुद्रवाडी येथे बुधवारी ८ सप्टेंबर रोजी येथील शिवाजी चंद्रकांत शिंदे (३४) याने पहाटे अडीच वाजता कौटुंबिक वादातून आई,पत्नी आणि मुलांना वेळूच्या काठीने जबर मारहाणीस सुरुवात केली. यावेळी झालेल्या आरडाओरडीनंतर शेजारील भावकीतील काका गुलचंद हरिबा शिंदे (६०) हे भांडण सोडवायला आले. यावेळी शिवाजीने गुलचंद शिंदे यांना सुद्धा काठीने डोक्यात मारहाण करीत गंभीर जखमी केले. यात ते बेशुद्ध पडले.
यानंतरही शिवाजीने पत्नी सरोजा ( ३०) आई जिजाबाई (५५) मुलगी कावेरी ( ५), कविता ( ३) आणि मुलगा संतोष ( ४) यांना मारहाण करीत गंभीर जखमी केले. यानंतर आरोपी घराबाहेर येऊन शेजारील बब्रुवान रंग हराळे यास डोक्यात काठी मारून जखमी केले. यानंतर नागरिकांनी आरोपीला पकडून एका घरात कोंडले. तसेच तातडीने सर्व जखमींना उपचारासाठी उमरगा येथे पाठविले. मात्र, प्रकृती गंभीर बनल्याने जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवले आहे. यात जखमी शेजारी गुलचंद हरिबा शिंदे यांचा सोलापूरकडे नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - करुणा शर्मांचा न्यायालयीन कोठडीतला मुक्काम लांबला; जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी
घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे,जी.बी.इंगळे,डी. जी.पठाण आदी घटनास्थळी दाखल झाले व आरोपी शिवाजी शिंदेला ताब्यात घेतले. मयताचा भाऊ भालचंद्र शिंदे यांच्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरसिक टीमला पाचारण केले असून गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकारी अनुराधा उदमले यांनी ही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे करीत आहे.
हेही वाचा - पुरात वाहून गेलेल्या माजी आमदाराच्या मुलाचा आणि नातवाचा मृतदेह सापडला