दुचाकी घसरुन एकजण मृत्युमुखी
उस्मानाबाद : दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना उमरगा-एकुरगा रस्त्यावर घडली आहे. लोहारा येथील फिरोज समद गवंडी हे ५ जून रोजी रात्री आपल्या दुचाकीवरुन उमरगा-एकुरगा रस्त्यावरुन प्रवास करीत होते. यावेळी त्यांच्या पाठीमागे एकुरगा येथील शौकत मकबूल शेख हे बसले होते. दुचाकी लक्षमी पाटीजवळ आल्यानंतर मातीच्या ढिगावरुन घसरली. यात जखमी झालेल्या शौकत शेख यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दुचाकी निष्काळजीपणे चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा सोमवारी गवंडी यांच्यावर उमरगा ठाण्यात नोंद झाला आहे.
पैश्यासाठी शुक्राचार्याने डोक्यात घातली खुर्ची
उस्मानाबाद : उसण्या पैश्यावर एका व्यक्तीस मारहाण झाल्याची घटना भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे घडली. माणकेश्वर येथील बापु मच्छिंद्र अंधारे हे काही दिवसांपूर्वी गावातील बँकेसमोर थांबले होते. तेव्हा आरोपी शुक्राचार्य घोडके याने त्यांच्याकडे येऊन उसणे पैसे मागितले. ते न दिल्याने आरोपी शुक्राचार्यने बापू यांच्या डोक्यात खुर्ची घालून त्यांना जखमी केले. याप्रकरणी सोमवारी देण्यात आलेल्या तक्रारीनुसार परंडा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विनाकारण फिरले, ७३ हजारांचा दंड
उस्मानाबाद : कोविड नियमांची पायमल्ली करुन सार्वजनिक रस्त्यावरुन विनाकारण फिरणार्या वाहनधारकांवर पोलिसांनी सोमवारी कारवाया केल्या. जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांवर सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत मनाई आदेशाचे उल्लंघन करुन खोटी कारणे देत फिरणार्या सुमारे ३१९ वाहनधारकांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून ७३ हजार ५०० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला.