बालाजी आडसूळ
कळंब - ग्रापं निवडणुकीत कुठं ‘परिवर्तन’ तर कुठे ‘ग्रामविकास’ आघाडी मैदानात उतरली आहेे. असं असलं तरी बॅनरवरचा हा ‘विकास’ वास्तवात मात्र ज्याच्या त्याच्या ‘वाड्यात’ घुसला असून ‘गावकी’च्या निवडणुकीत यंदाही ‘भावकी’च्या मुद्यालाच महत्व दिले जात असल्याचे दिसून येत आहे.
कळंब तालुक्यातील ५३ ग्रापंचे कारभारी येत्या १५ जानेवारीला ठरणार आहेत. यात इटकूर, येरमाळा, मंगरूळ, दहिफळ, रांजणी, नायगाव, पाडोळी, हावरगाव, शेलगाव, वडगाव, चोराखळी, कन्हेरवाडी यासारख्या महत्वाच्या ग्रापंचा समावेश आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी तयारी अंतिम टप्यात असतानाच लढतीचे चित्र स्पष्ट झालेल्या ग्रामीण भागात ग्रापंची सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यात काही गावात महाविकास आघाडीचे पाऊल पडले असून भाजपाची कोंडी करण्यात आली आहे. तर काही गावात सेना, भाजपा, राष्ट्रवादी यांनी ‘स्वबळ’ अजमावले आहे. यात इटकूर, येरमाळा येथील तिरंगी लढती वगळता इतर गावात दुरंगी लढती होत आहेत.
उमेदवार, नेते विजयासाठी धडपड करत आहेत. यात सत्ताधारी ‘सत्ता’ टिकवण्यासाठी तर विरोधक ‘परिवर्तन’ करण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरत आहेत. या स्थितीत बहुतांश गावात विकासाचा मुद्दा हा केवळ ‘बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी’ ठरत असून प्रत्यक्षात निवडणूक नेहमीप्रमाणे ‘गावकी अन् भावकी’ अशा चक्रव्यूहात अडकली आहे.
चौकट...
मुद्दे बाजूला, विकास पुन्हा वाड्यात घुसला...
गावगाड्यात भावकी, त्यांचे वाड्याला चांगलेच महत्व. ही ‘भाऊबंदकी’ विशेषतः ग्रापं निवडणुकीत बहरात येते. अशावेळी कुठे मागचा ‘हिशोब’ चुकता करायचा असतो तर कुठे पदावर आपल्या माणसांचं ‘बस्तान’ बसवायचं असतं.यात विकासाचा मुद्दा मात्र अचानक गायब होतो. यंदाही बहुतांश गावात निवडणूक रंगात आली असताना ‘विकास’ ज्याच्या त्याच्या ‘वाड्यात’ लुप्त झाला आहे. आडनाव अन् वाड्यावर ‘एकीची मोट’ बांधली जात आहे.
या खिचडीला नाव काय द्यावे
महाविकास आघाडीचा प्रयोग इटकूर, कन्हेरवाडी गावात झाला आहे. तर बहुला, पिंपळगाव येथे सेना, बोर्डा व इटकूर येथे भाजपाचे स्वतंत्र पॅनल आहेत. एका पक्षाचे शिक्कामोर्तब असलेले पॅनल क्वचित आहेत. बहुतांश गावात समविचारांची ‘खिचडी’ शिजली आहे. यामुळे सध्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ असा सूर आळविला जात असला तरी मोठ्या गप्पा मारणारे अनेक ‘राव’ गावात स्वतंत्र पॅनल उभे करण्यात, उमेदवार उभे करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे.