उस्मानाबाद : जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांना केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या फिट इंडिया माेहिमेअंतर्गत ऑनलाईन नाेंदणीचे निर्देश आहेत. नाेंदणीसाठी अवघे दाेन दिवस हाती उरले असतानाही जिल्हाभरातील सुमारे चाैदाशेवर शाळा नाेंदणीविना असल्याचा प्रकार समाेर आला आहे. तर नाेंदणी केलेल्या शाळांची संख्या ४३२ म्हणजेच २२.१८ टक्के एवढी अल्प आहे.
केंद्र सरकारच्या खेलाे इंडिया अंतर्गत फिट इंडिया हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्ट्या तंदरूस्त ठेवण्यासाठी तसेच शारीरिक सदृढतेचे महत्व पटवून देण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांना ऑनलाईन नाेंदणी करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यात सर्व माध्यमाच्या मिळून थाेड्याथाेडक्या नव्हे, तर तब्बल १ हजार ८४१ शाळा आहेत. या सर्व शाळांनी २७ डिसेंबर अखेर फिट इंडिया उपक्रमाअंतर्गत ऑनलाईन नाेंदणी करणे गरजेचे आहे. परंतु, नाेंदणीतील गती पहाता, मुदतीत शाळा नाेंदणी पूर्ण हाेते की नाही, हा माेठा प्रश्न आहे. आजवर अवघ्या ४२३ शाळांकडून ऑनलाईन नाेंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे आजही थाेड्याथाेडक्या नव्हे तर तब्बल १ हजार ४१८ शाळा नाेंदणीविना असल्याचा प्रकार समाेर आला आहे. याचे प्रमाण २२.१८ टक्के इतके अत्यल्प आहे. उर्वरित शाळांच्या हाती आता नाेंदणीसाठी केवळ दाेन दिवस उरले आहेत.
चाैकट...
तांत्रिक अडचणी ठरताहेत विलंबास कारण...
फिट इंडिया या उपक्रमांतर्गत शाळांच्या नाेंदणीसाठी स्वतंत्र लिंक येते. यावर नाेंदणी करताना अनंत अडचणींना ताेंड द्यावे लागत असल्याचे काही शाळांच्या शिक्षकांकडून सांगण्यात आले. बहुतांशवेळा नेटच्या स्पीडची अडचण येते. त्यामुळे लिंक ओपन हाेत नाही. यासह अन्य अडचणींमुळे शाळा नाेंदणीची गती वाढत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
शासनाकडून मिळालेल्या सूचनेनुसार सर्व शाळांना आदेशित केले हाेते. त्यानुसार शाळा नाेंदणीचे काम सुरू आहे. दाेन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील २२.१८ शाळांनी नाेंदणी केली आहे. आणखी दाेन दिवसांत जास्तीत जास्त शाळांची नाेंदणी करून घेण्यात येणार आहेत. तशा सूचना सर्व शाळांना दिल्या आहेत.
-भाग्यश्री बिले, जिल्हा क्रीडाधिकारी, उस्मानाबाद.
जिल्हाभरातील सर्व शाळांनी फिट इंडियाअंर्गत नाेंदणी करावी, असे पत्र पंचायत समित्यांच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना काढले हाेते. त्यानुसार संबंधित कार्यालयानेही शाळांना आदेशित केले आहे. सध्या सव्वाचारशेवर शाळांनी नाेंदणी केली आहे.येत्या दाेन दिवसांत हे प्रमाण आणखी वाढेल. जास्तीत जास्त शाळा या उपक्रमात सहभागी व्हाव्यात, असा आमाचा प्रयत्न आहे.
-गजानन सूसर, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.