उस्मानाबाद -सर्वाेत्कृष्ट तपास व सेवेसाठी केंद्र सरकारच्यावतीने देण्यात येणारे केंद्रीय गृहमंत्री पदक उस्मानाबादचे सुपुत्र अजित राजाराम टिके यांना जाहीर झाले आहे. टिके हे सध्या सांगली शहर येथे पाेलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत आहेत.
पाेलीस उपअधीक्षक टिके हे वाई येथे कार्यरत असताना एका घाटामध्ये कुजलेला मृतदेह आढळून आला हाेता. घटनास्थळावर सापडलेली एक चिठ्ठी वगळता इतर काेणताही पुरावा पाेलिसांच्या हाती नव्हता. या चिठ्ठीच्या आधारे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटविण्यात आली हाेती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास केला असता, एक-दाेन नव्हे तर तब्बल चार खुनांची मालिका उघडकीस आली हाेती. यात आईवडिल व दाेन मुलांचा समावेश हाेता. हाेमगार्डमध्ये नाेकरी लावताे, म्हणून आराेपीने सुरुवातीला दाेन्ही भावांची हत्या केली. यानंतर मुलांच्या शाेधात असलेल्या आईवडिलांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह वाई येथील एका खाेल दरीत फेकून दिल्याचे तपासातून समाेर आले हाेते. सदरील कुटुंब सांगली जिल्ह्यातील कुपवाडा येथील हाेते. त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने उत्कृष्ट तपास व सेवेसाठीचे गृहमंत्री पदक जाहीर केले आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.