उस्मानाबाद : ‘असेसमेंट करून रिक्त पदे भरायला हवीत’, अशा शब्दात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी एकप्रकारे केंद्रातील भाजपा सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे रविवारी उस्मानाबाद दौऱ्यावर आले असता, त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सदरील विधान केले.
केंद्रातील ‘एनडीए’ सरकारच्या काळात मागासवर्गीयांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. केंद्राच्याच अहवालानुसार मागील दोन वर्षात अशा घटनांचे प्रमाण १७ वरून तब्बल २७ टक्क्यांवर पोहोचले आहे. असे असतानाच उत्तर प्रदेशातील अत्याचाराच्या घटनेनंतर तर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे केंद्र आणि उत्तर प्रदेशातील राज्य सरकारच्या भूमिकेवर सर्वच स्तरातून सकडून टिका होत आहे. या निमित्ताने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या रिक्त पदांचा मुद्दाही चर्चेत आला आहे. मागासवर्गीयांवरील अत्याचारांत वाढ होत असतानाही रिक्त पदे भरण्याकडे का लक्ष दिले जात नाही, असा सवाल केला जाऊ लागला आहे. दरम्यान, केंद्रीय ग्राहक संरक्षण व अन्नपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे रविवारी उस्मानाबाद दौऱ्यावर आले असता पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्यांना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या रिक्त जागांबाबत प्रश्न केला असता, ‘असेसमेंट करून पदे भरायला हवीत’, अशा शब्दात केंद्रातील भाजप सरकारला घरचा आहेर दिला. यावेळी त्यांनी शेतकरी कायद्याच्या अनुषंगाने काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर सडकून टिका केली. शेतकऱ्यांच्या हिताचे त्यांना काहीही पडलेले नाही. ‘आमच्या मंडीत (बाजार समिती) आलेल्या शेतीमालाचे कमिशन आम्हाला मिळत नाही’, हे त्यांचे खरे दुखणे आहे’, अशा शब्दात त्यांनी काँग्रेस व त्यांच्या सहयोगी पक्षांचा समाचार घेतला. पत्रकार परिषदेस आमदार सुजितसिंह ठाकूर, भागवत कराड, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी अध्यक्ष दत्ता कुलकर्णी आदी उपस्थित होते.