तामलवाडी (जि. धाराशिव): पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी येथील भाविक बापूराव गुंड हे उलटे चालत चारशे किमीचे अंतर कापून श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरी दाखल होतात. बुधवारी ते तामलवाडी टोलनाक्यावर दाखल झाल्यानंतर नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. या यात्रेत ते सध्याच्या ज्वलंत विषयांची जनजागृतीही करीत आहेत.
फुरसुंगी येथील बापूराव गुंड हे कापड दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. सामाजिक भान असलेले बापूराव २० वर्षांपासून श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येतात. मात्र, त्यांच्या फुरसुंगी ते तुळजापूर प्रवासाची स्टाईल काहीशी हटके आहे. त्यांच्या गावातून ते उलटे चालत तब्बल चारशे किलोमीटरचे अंतर कापतात. यंदा ५ ऑक्टोबर रोजी त्यांच्या या पायी यात्रेला सुरुवात झाली. बुधवारी बापूराव तुळजापूर-सोलापूर महामार्गावरील तामलवाडी टोल नाक्यावर दाखल झाले. तेव्हा येथील रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी तामलवाडी सोसायटीचे संचालक पांडुरंग लोंढे, रुग्णवाहिका कर्मचारी विलास घोटकर, सचिन कुठार, प्रवीण, टोल नाक्याचे व्यवस्थापक दादासाहेब शिंदे व नागरिक उपस्थित होते.
यंदा आरक्षणावरही जनजागृती...बापूराव गुंड हे दरवर्षी पर्यावरण, वाहतूक नियम, बेटी बचाव, राष्ट्रीय एकात्मता अशा विषयांवर जनजागृती करीत असतात. यावर्षी त्यांनी सध्याचा ज्वलंत प्रश्न असलेल्या मराठा आरक्षण, शंभर टक्के मतदान या विषयांवरही जनजागृती आपल्या यात्रेदरम्यान केली आहे.