कळंब -तालुक्यातील हसेगाव (के), तांदूळवाडी, आंदोरा आदी गावाच्या शिवारात शनिवारी दुपारी जोरदार वादळी पाऊस झाला. यामुळे काही ठिकाणी शेतातून पाणी बाहेर पडले. हा पाऊस उसाच्या फडासाठी फायद्याचा ठरला असतानाच आंब्याचे मात्र मोठे नुकसान करणारा ठरला आहे.
तालुक्यातील हसेगाव (के), आंदोरा, कन्हेरवाडी, तांदूळवाडी, वाकडी, हावरगाव, कळंबचा काही भाग, सात्रा, डिकसळ आदी शिवारात शनिवारी दुपारी जोरदार पावसाचे आगमन झाले.
यावेळी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारेही वाहत होते. या पावसाने शेतकऱ्यांच्या उन्हाळी मशागतीच्या कामात व्यत्यय आणला. विशेषतः हसेगाव, तांदूळवाडी शिवारात पावसाचा जोर जास्त होता.
हसेगाव येथे वावरात पाणी साचले होते. यामुळे भर उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभूती येत असल्याचे ज्ञानेश्वर तोडकर यांनी सांगितले तर तांदूळवाडी येथे शेताला तळ्याचा आकार येत बांध फोडून पाणी बाहेर आल्याचे आप्पासाहेब काळे यांनी सांगितले.
आंदोरा येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सोबतच्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. आंब्याच्या झाडाखाली पाडाला आलेल्या आंब्याची पसर पडली आहे. हा पाऊस फक्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा करणारा असल्याचे विनोद तांबारे यांनी सांगितले.
चौकट
वीज पडून तीन म्हशी ठार
जोरदार मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात वीज पडल्याने तीन म्हशी ठार झाल्या आहेत. कोठाळवाडी येथील सुरेश साहेबराव शिंदे यांच्या इटकूर शिवारातील शेतातील गोठ्यात वीज पडून एक म्हैस जागीच ठार झाली. अशाच घटनेत डिकसळ येथील नागोराव जाधव, सात्रा येथील कल्याण पांडुरंग शिंदे यांची प्रत्येकी एक म्हैस मयत झाली आहे. याप्रकरणी तलाठी यांनी पंचनामे करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केले आहेत.