धाराशिव : जिल्ह्यास पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज गुरुवारी प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. उमरगा, कळंबमध्ये मोठे नुकसान केल्यानंतर यावेळी हा पाऊस आता उत्तरेकडे सरकून भूम, परंड्यात धुमशान घालण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
मार्च महिन्यात दोन वेळा अवकाळीचा तडाखा सोसल्यानंतर एप्रिलमध्येही पुन्हा उमरगा, कळंब तालुक्यात गारपीट होऊन मोठे नुकसान झाले. दोन दिवसांपूर्वीच खुद्द मुख्यमंत्र्यांनी या नुकसानीची दखल घेत शेतशिवारात पाहणी केली. यानंतर आता पुन्हा अवकाळी बरसण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. शुक्रवारपासून जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वार्यासह सरी बरसण्याचा अंदाज आहे. मागील वेळी सर्वाधिक फटका हा उमरगा व कळंब तालुक्याला बसला होता. यावेळी अवकाळी उत्तरेकडे सरकून या भागातील भूम व परंडा तालुक्यात सर्वाधिक बरसण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे.
शुक्रवारी जिल्हाभरात सरासरी १५ मिमी तर शनिवारी १७ मिमी पावसाचा अंदाज आहे. यानंतर त्यात काहिशी घट होत जाऊन रविवारी १०, सोमवारी ६ व मंगळवारी ९ मिलीमीटर पाऊस बरण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे.