बालाजी अडसूळ
उस्मानाबाद (कळंब) - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत किरकोळ मार्काने यश हुलकावणी देत होतं, तरी हताश न होता 'अधिकारी' व्हायचयं हे स्वप्न उरी बाळगलेल्या तालुक्यातील बोर्डा येथील डॉ. रविंद्र आपदेव शेळके यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत राज्यात दुसरा व मागासवर्गीयातून राज्यात पहिला क्रमांक मिळवत आपली उपलजिल्हाकारीपदी वर्णी लावली आहे.
तालुक्यातील बोर्डा येथील आपदेव शेळके हे कळंब आगारात वाहक म्हणून कार्यरत होते.मागच्या तीन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शेळके यांना श्रीकांत, प्रशांत व रविंद्र ही तीन मुलं. यापैकी रवींद्र हा लहानपणापासूनच जिद्दी आणि हुशार.बोर्डा येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमीक शिक्षणाचे धडे गिरवलेल्या रविंद्र यांचे माध्यमिक शिक्षण कळंब येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात झाले.
अभ्यासात हुशार असलेल्या रवींद्र यांनी उच्च माध्यमिक शिक्षणासाठी लातूर निवडले.येथील सुशिलाादेवी देशमुख महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेत घेत, वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेची तयारी केली. यातही घवघवीत यश मिळवत राज्यात सहावा क्रमांक प्राप्त केला.तदनंतर रविंद्र शेळके यांनी मुंबई येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पुर्ण केले.
यानंतर मात्र रविंद्र यांच्यातील जिद्द शांत बसू देत नव्हती.खुलताबाद व पुणे येथे वैद्यकीय सेवा बजावत हळूहळू स्पर्धा परीक्षेची तयारी सुुरू केली.अधिकारी व्हायचं तर मग स्पर्धा परीक्षेची, ती ही थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करायची म्हणून दिल्ली गाठली. याठिकाणी एक वर्ष मेडीकल इन्टरशिप करत अभ्यासात झोकून दिलं.
दरम्यान,केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी सुरू असतांनाच राज्य लोकसेवा आयोगाची जाहिरात निघाल्यानंतर अर्ज दाखल केला.अभ्यासातील सातत्य, कुंटूबातील वडील आपदेव, आई पद्मिनी यांचे बळ, प्रयत्नातील सातत्य यामुळे डॉ. रविंद्र आपदेव शेळके यांनी एमपीएससीच्या राज्य सेवा मुख्य परिक्षा २०१९ मध्ये घवघवीत यश मिळवले आहे. त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
▪️राज्यात पहिला क्रमांक... डॉ. रविंद्र आपदेव शेळके यांनी राज्यसेवा परिक्षा २०१९ मध्ये सर्वसाधारण यादीत राज्यात दुसरा तर स्पेशल ईकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास (एसईबीसी) या मागास प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. राज्यात प्रथम आलेल्या उमेदवारास ५८६ तर बोर्डा येथील डॉ रविंद्र आपदेव शेळके यांना ५८२ गूण आहेत.यात लेखी परिक्षेत ५३२ तर तोंडी परिक्षेत ५० असे गूण मिळवले आहे.यातही लेखीमध्ये डॉ रविंद्र राज्यात प्रथम ठरले आहेत.या परिक्षेत उपजिल्हाधिकारी पदासाठी ४० उमेदवाराची निवड केली आहे यात शेळके यांची वर्णी लागली आहे
▪️गड जिंकला, तो ही कळंब शहरातून...
यासंदर्भात डॉ रविंद्र शेळके यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सुरुवातीस डॉक्टर व्हायचं अस ठरवल होतं.परंतुं वैद्यकीय सेवा बजावत असताना एका परिघात अडकले जात असल्याचे त्यांच्या लक्षात आलं. यामुळे समाजातील विविध घटकात काम करण्याची संधी मिळवण्यासाठी अधिकारी व्हायचं असं ठरवलं.यासाठी एक वर्ष दिल्लीत तयारी केली.यश हुलकावणी देत होतं. खर्चाच्या मर्यादा होत्या. यामुळे शेवटी कळंब येथील स्वगृही वास्तव्य करत २०१९ च्या राज्यसेवा परीक्षेची तयारी केली. यात यश मिळाले असे डॉ. रविंद्र शेळके यांनी सांगितलं.
▪️यशाची अपेक्षा होतीच फक्त नंबरची उत्सुकता होती...
यासंदर्भात डॉ. रविंद्र शेळके यांचे वडील तथा कळंब आगारातील सेवानिवृत्त वाहक आपदेव शेळके यांच्याशी संपर्क साधला असता आपल्या मुलाने राज्यात नावलौकिक मिळवला याचा आनंद व्यक्त केला.तो गुणी, हुशार व जिद्दी आहे.आपल्याला अधिकारी व्हायचंय या स्वप्नपूर्तीसाठी तो अभ्यासात सातत्य ठेवत असे. यामुळे यश तर मिळवणार आहे याची खात्री होतीच फक्त नंबर कितवा आहे याची उत्सुकता लागली होती. यापुर्वी त्यांनी विविध परिक्षेच्या निकालापूर्वी सांगितलेले गूण तंतोतंत ठरले जायचे. यामुळे यशाबद्दल आत्मविश्वास होता असे सांगितले.