येणेगूर : परिसरात सध्या उशिराने पेरणी केलेल्या उडीदाच्या राशी सुरू असून, ऐन दाणे भरण्याच्या स्थितीत पीक असताना पावसाने दिलेल्या उघडीपीमुळे उताऱ्यात मोठ्या प्रमाणात घट आल्याचे शेतकरी सांगत आहेत.
यंदा मृग, आर्द्रा नक्षत्राच्या हुलकावणी नंतर पूनर्वसू नक्षत्राच्या पावसावर येणेगूर परिसरातील शेतकऱ्यांनी उडीद, मूग, सोयाबीन पिकाची पेरणी केली. यानंतर उशिराने पेरलेल्या कोवळ्या पिकावर गोगलगाय, पैसा या किडीच्या उपद्रव झाला. यातूनही तग राहून जगलेली खरिपाची पिके तब्बल २३ दिवस पावसाने उघडीप दिल्याने संकटात सापडली. ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेत पिके असताना पावसाच्या उघडीपचा मोठा फटका शेतकऱ्यांना आता काढणीच्या वेळेस बसत आहे. एकरी पाच ते सातकट्टे उडीदाचा उतारा घेतलेल्या शेतकऱ्यांना आता अवघा एकरी दोन ते अडीच कट्टेच उतार पडत असल्याने पदरमोड करून उडीदाच्या राशी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लागवड खर्च व उत्पादनातील घट पाहता उशिराने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना काढणीसाठी प्रती एकरी चार हजाराचा तोटा सहन करावा लागत असल्याचे शेतकरी गणेश बिराजदार यांनी सांगितले.