धाराशिव : गॅस सिलिंडरच्या दरामध्ये सातत्याने दरवाढ केली होती. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबीय मेटाकुटीला आले आहेत. गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी भाजण्यात आल्या. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मार्च महिना उजाडताच महागाईचा भडका उडाला आहे. घरगुती गॅस सिलिंडर २०४ रुपयांनी तर व्यावसायिक सिलिंडरचे दरातही तब्बल ३५० रुपयाने वाढ झाली आहे. याचा फटका सामान्य कुटूंबांना व छोट्या व्यावसायिकांना बसत आहे. मात्र, शासनाकडून महागाईवर नियंत्रण ठेवले जात नसल्याचा आरोप करीत वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने चुलीवर हिरव्या मिरचीचा ठेचा अन् भाकरी भाजून दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. गॅस दरवाढ रद्द झालीच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणांनी परिसर आंदोलनकर्त्या महिलांनी दणाणून सोडला होता. या आंदाेलनात वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा लाेखंडे यांच्यासह महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.