तेर : ग्रामीण भागात ग्रामस्थांना सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत विविध करांची आकारणी करीत असते. यामध्ये घराच्या बांधकामानुसार कर ठरविला जातो. शिवाय, नळपट्टी, गाळेधारकांना ठरवून दिलेल्या भाडे आदी करांच्या माध्यमातून गावातील दिवाबती, नाल्यांची सफाई, स्वच्छता आदी कामे केली जातात. मात्र, अनेक जण कराचा भरणा करत नाहीत. अशांसाठी आता लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून, जे कर भरणा करीत नाहीत त्यांना आता या लोकअदालतीत जावे लागणार आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी, येडशी या मोठ्या ग्रामपंचायतींच्या गावांतील करभरणा न करणाऱ्या ग्रामस्थांसाठी उस्मानाबाद येथे राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार २५ सप्टेंबर रोजी ही राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावरील थकीत घरपट्टी, पाणीपट्टीबाबतची प्रकरणे तडजोडीने मिटवण्यासाठी ठेवण्यात आली असून, यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीने १० हजारांच्या पुढे घरपट्टी थकीत असलेल्या ग्रामस्थांसह थकबाकीदार गाळेधारकांनादेखील थकीत कर भरण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधितांनी २० सप्टेंबरपर्यंत याचा भरणा न केल्यास हे प्रकरण लोकअदालतीत जाणार आहे.
दरम्यान, उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी, तडवळे, येडशी या चार ग्रामपंचायतींची पाणीपुरवठा योजनेवरील पाणीपट्टी नळधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकीत आहे. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजना बंद आहे. त्यामुळे थकीत नळपट्टीची ही प्रकरणे आता लोकअदालतीकडे जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.