उस्मानाबाद : एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी जाण्यास निघालेल्या शिवसैनिकांच्या कारला शुक्रवारी पहाटे उस्मानाबादेत अपघात झाला. वाहनावरचा ताबा सुटल्याने खड्ड्यात कोसळलेल्या कारमधील एक जण जागीच ठार झाला. तर शहराध्यक्षासह अन्य एक जण जखमी झाले आहेत.
मूळचे कळंब तालुक्यातील गौर येथील व उस्मानाबाद शहरात स्थायिक झालेले शिवसैनिक बाळासाहेब देशमुख हे त्यांच्या कारने शुक्रवारी पहाटे बाहेरगावी जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्यासमवेत कारमध्ये शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मुंडे व सहकारी सूरज शिंदे हेही होते. पहाटे २ वाजण्याच्या सुमारास सोलापूर-धुळे महामार्गावरून रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची कार उस्मानाबादच्या एमआयडीसी भागात शिरली. काही अंतर पुढे गेल्यानंतर रस्त्याचा अंदाज न आल्याने ही कार रस्त्यालतच्या खड्ड्यात जाऊन कोसळली. या अपघातात कारच्या मधल्या सीटवर बसलेल्या बाळासाहेब देशमुख यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच मृत्युमुखी पडले. तर समोरच्या बाजूला बसलेले सेनेचे शहराध्यक्ष संजय मुंडे व सूरज शिंदे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उस्मानाबादेत उपचार सुरू आहेत. दरम्यान, मयत बाळासाहेब देशमुख यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी उस्मानाबादेतील कपिलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
एअरबॅगमुळे ते वाचले...
अपघातग्रस्त कारच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला आहे. वाहनात पुढील बाजूस सेनेचे शहराध्यक्ष संजय मुंडे व सूरज शिंदे हे बसले होते. अपघात घडल्यानंतर लागलीच कारमधील एअरबॅग समोर आल्या. त्यामुळे या दोघांनाही मोठी दुखापत झाली नाही. या अपघातातून हे दोघे बालंबाल बचावले.