कळंब : शहरातील मुख्य रस्त्यावर लहान-मोठी वाहने पार्किंग केली जात असल्याने व्यापाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. यासाठी नगर परिषदेने शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यामागील जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेने नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावर, चौक परिसरात विविध ठिकाणी वाहने पार्किंग करत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील सर्वच मुख्य रस्त्यावर शेकडो वाहने उभी असल्याने अबालवृद्ध, महिला यांना रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. शहरातील व बाहेरून येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. या वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था नसल्याने व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर दिवसभर वाहने उभी असल्याने दुकानात ग्राहक येत नाहीत.
वाहन चालकांना वाहने चालविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने शहरातील पार्किंगसाठी शहरातील स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे, नाट्यगृहाचे बांधकाम सुरू होईपर्यंत लहान-मोठ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी. तसेच येथे यासाठी एका कर्मचाऱ्याची ही नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, नगरसेवक सतीश टोणगे, शिवसेना शहरप्रमुख प्रदिप मेटे, शाम खबाले, माजी नगरसेवक प्रताप मोरे, नगरसेवक अनंत वाघमारे, रोहन पारख, संजय घुले, डॉ. रूपेश कवडे, युवासेना शहरप्रमुख गोविंद चौधरी, किरण राजपूत, अनिल पवार, बबलू चोंदे, गजानन चोंदे, सुनील पवार, ॲड. मंदार मुळीक, रोहन नानजकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.