कळंब (जि. उस्मानाबाद) : सध्या उन्हाचा कडाका वाढलेला आहे. तापमानाचा पारा ४० अंशापार गेला आहे. अशा परिस्थितीत भर दुपारी उन्हात काम केल्याचा फटका कळंब तालुक्यातील हासेगाव केज येथील शेतकऱ्याला बसला. उन्हात काम करुन येताच पाणी प्यायल्याने या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. (farmer's death by sunstroke in Osmanabad)
उस्मानाबाद जिल्ह्यात तापमान वाढीस लागले आहे. पारा ४० अंशाच्याही पुढे गेला आहे. अशातच तुळजापूरच्या कृषी हवामान केंद्राने कळंब तालुक्यात इतर ठिकाणाहून अधिक तापमान असण्याचा अंदाज वर्तविला होता. शेतकऱ्यांना उन्हात कामे न करण्याचा सल्लाही केंद्राकडून देण्यात आला होता. मात्र, हासेगाव केज येथील शेतकरी लिंबराज तुकाराम सुकाळे (५०) हे गुरुवारी दुपारी भर उन्हात शेतात काम करीत होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तहान लागल्याने काम थांबवून ते पाण्याच्या ठिकाणी आले. काही वेळ विसावा घेण्याऐवजी सुकाळे हे लागलीच पोटभर पाणी प्यायले. यानंतर काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले.
ही बाब लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. सायंकाळी झालेल्या त्यांच्या शवविच्छेदन अहवालातही हा उष्माघाताचाच प्रकार असल्याचे स्पष्ट झाल्याचे उपजिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आले. लिंबराज सुकाळे हे यंदाच्या मोसमातील उष्माघाताचे जिल्ह्यातील पहिला बळी ठरले आहेत.