तुळजापूर ( धाराशिव ): जिल्ह्यातील इनामी जमिनी वर्ग एकमध्ये कायम ठेवाव्यात व इतर मागण्यांसाठी जिल्हा शेतकरी बचाव समितीच्या वतीने शुक्रवारी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिरासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.
प्रलंबित मागण्यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील दखल न घेतली जात नसल्याने सोमवारी सरकारला सद्बुद्धी मिळावी, याकरिता श्री तुळजाभवानी मंदिरासमोर संबळ, हलगी वाजवत जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी इनामी जमिनी वर्ग एकमध्ये कायम ठेवण्यात याव्यात, मदत मास, खिदमत मास, सिलिंग जमीन व महार वतन वर्ग १ मध्ये कायम ठेवावे, जमिनी खालसा करुन द्याव्यात, नजराणा व दंडाची आकारणी रद्द करावी आदी मागण्या लावून धरल्या होत्या. यावेळी शेतकरी बचाव समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे, महादेव लिंगे, राजाभाऊ बागल, प्रा. अर्जुन जाधव आदी उपस्थित होते.