उस्मानाबाद : १ जूनपासून निर्बंधात शिथिलता येईल, पुन्हा एकदा बाजार भरेल... कोरोना संसर्गात रुतलेला जीवनगाडा पुन्हा सुरळीत होईल, अशी आशा नागरिकांना लागून होती. मात्र, पॉझिटिव्हिटी रेट हा अजूनही १० पेक्षा खाली न आल्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात लॉकडाऊन लांबविण्यात आले आहे. निर्बंध कायम ठेवण्यात आल्याने आता आणखी १५ दिवस वाट पाहण्याशिवाय, गत्यंतर दिसत नाही.
उस्मानाबादची अर्थव्यवस्था ही कृषी आधारित आहे. त्यामुळे भलेही शासनाचे आर्थिक वर्ष एप्रिलपासून सुरू होत असले तरी उस्मानाबादचे आर्थिक वर्ष हे एका अर्थाने पावसाळ्यापासूनच सुरू होते. कृषी व शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी जूनच्या सुरुवातीपासूनच बाजारात रेलचेल दिसते. मात्र, गेल्या वर्षभरापासून कोरोनारूपी संकटाला तोंड देत नागरिकांचे जगणे कसेबसे सुरू आहे. यावेळीही महिनाभराचा लॉकडाऊन पाळल्यानंतर रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून आली आहे. त्यामुळे आता १ जूनपासून बाजारपेठ व जनजीवन सुरळीत होईल, अशी आशा होती. मात्र, राज्य शासनाने साप्ताहिक पॉझिटिव्हीटी रेट हा १० टक्केच्या खाली असेल तरच स्थानिक पातळीवर निर्बंधात शिथिलता देण्याबाबतचे निर्देश जिल्ह्यांना दिले आहेत. उस्मानाबादचा शेवटच्या आठवड्यातील पॉझिटिव्हिटी रेट हा काठावर म्हणजेच जवळपास ११ टक्केपर्यंत आला आहे. त्यामुळे जिल्ह्याला निर्बंधातून सूट मिळू शकली नाही. परिणामी, १५ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत सध्या आहे, तसेच चालू द्या, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने सोमवारी काढले आहेत.
यांना असेल पूर्णवेळ मुभा...
१५ जूनपर्यंतच्या कालावधीत पूर्वीप्रमाणेच वैद्यकीय, पशुवैद्यकीय सेवा, शीतगृह, वखार, सार्वजनिक वाहतूक, मालवाहतूक, पाणीपुरवठा, एटीएम, विद्युत व गॅस सिलिंडर पुरवठा, स्थानिक विभागांची मान्सूनपूर्व कामे, सार्वजनिक सेवा, दूरसंचार सेवा, आयात-निर्यात सुविधा, मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे, शासकीय व खासगी सुरक्षा सेवा, अत्यावश्यक सेवेच्या उत्पादनासाठीचे कच्चे माल, पॅकेजिंग, पावसाळ्याच्या अनुषंगाने व्यक्ती व संस्थाकरिता आवश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग सर्व पालिका व नगरपंचायत हद्दीच्या १० किमीपुढील पेट्रोलपंप, अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठीच ई-कॉमर्स सेवांना पूर्णवेळ मुभा देण्यात आली आहे.
सकाळी ७ ते ११ वेळेत हे सुरू...
किराणा दुकाने, भाजीपाला, दूध, फळ विक्री, सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने, पालिका व नगरपंचायतीच्या १० किमी परिघातील पेट्रोलपंप हे सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरु राहतील. याशिवाय, सेबीची मान्यताप्राप्त कार्यालये, अत्यावश्यक सेवेतील कंपन्यांची कार्यालये, विमा, वैद्यकीय विमा कार्यालये, आरबीआयद्वारे नियंत्रित संस्था, सर्व बँकिंग सेवा न देणाऱ्या वित्तीय संस्था, सूक्ष्म वित्तीय संस्था, न्यायालय, न्यायाधिकरणाचे काम सुरू असल्याची विधिज्ञांची कार्यालये सकाळी ७ ते ११ या वेळेत नागरिकांसाठी सुरु राहतील. नंतर प्रवेशद्वार बंद करून अंतर्गत कामकाज करता येईल.
कृषी बँकिंग सेवा २ वाजेपर्यंत...
कृषी साहित्याची दुकाने तसेच संबंधित उपकरणे, दुरुस्ती सेवांची दुकाने, सर्व प्रकारच्या बँका यांना दुपारी २ वाजेपर्यंत नागरिकांना सेवा देण्यासाठी मुभा असणार आहे. नंतर नागरिकांसाठी या सेवा बंद असतील. बँकांना अंतर्गत कामकाज यानंतर करता येईल. हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांना आपले व्यवसाय उघडता येणार नाहीत. मात्र, त्यांना घरपोच सेवा देण्यास मुभा असणार आहे.
जनता कर्फ्यू आता रविवारीच...
निर्बंधातून शिथिलता तर उस्मानाबादच्या वाट्याला आली नाहीच, मात्र जनता कर्फ्यूतूनही जिल्हा सुटू शकला नाही. असे असले तरी यातून एक दिवसांची सूट मिळाली आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सोमवारी काढलेल्या आदेशानुसार सध्याचे निर्बंध कायम राहतील, असे सांगतानाच यापूर्वी शनिवार व रविवारी पाळण्यात येणारा जनता कर्फ्यू आता यापुढे केवळ रविवारीच याचे पालन होणार असून, शनिवारी यातून सूट देण्यात आल्याचे नमूद केले आहे.