वाशीत घर फोडले
उस्मानाबाद : वाशी येथील विकास जगताप यांच्या घराचा कडी-कोयंडा अज्ञात चोरट्यांनी तोडून आतील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना ६ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी जगताप यांनी वाशी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला.
धरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
उस्मानाबाद : अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात ३ जानेवारी रोजी तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी शिवारात झाला.
धनगरवाडी शिवारातील रस्त्याने जाणाऱ्या अनोळखी व्यक्तीस अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघात जखमी होऊन ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तींचा मृत्यू झाला. नळदुर्ग पोलीस ठाण्याचे गोरखनाथ शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकावर नळदुर्ग पाेलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
४०२ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा
उस्मानाबाद : जिल्ह्यातील विविध मार्गांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६ जानेवारी राेजी ४०२ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आली. या वाहनचालकांकडून ८६ हजार ५०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. जिल्ह्यातील १८ पोलीस ठाणी व वाहतूक शाखेच्या वतीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
दारू पिण्यास पैसे न दिल्याने काठी मारून केले जखमी
उस्मानाबाद : दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने एकास डोक्यात काठी मारून जखमी केले. तसेच, बचावासाठी आलेल्या दोघांना धक्काबुक्की केली. ही घटना उमरगा तालुक्यातील बलसूर येथे ६ जानेवारी रोजी घडली.
बलसूर येथील विठ्ठल वाकडे हे आपल्या घरासमोर थांबले होते. यावेळी गावातील साधू वाकडे याने तेथे येऊन मद्य पिण्यास पैसे मागितले. विठ्ठल वाकडे याने पैसे देण्यास नकार दिल्याने साधू वाकडे यांनी चिडून विठ्ठल यांच्या डोक्यात काठी मारून जखमी केले. विठ्ठल यांच्या बचावासाठी मुलगा व सून आले असता साधू वाकडे यांनी त्या दोघांनाही धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद विठ्ठल वाकडे यांनी उमरगा ठाण्यात दिली. यावरून साधू वाकडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला.