अंतर्गत रस्त्यांवर खड्डे
उस्मानाबाद : नगर परिषदअंतर्गत येणाऱ्या वाढीव हद्द भागातील अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पालिकेने लक्ष देऊन रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी तेथील रहिवाशांतून जाेर धरू लागली आहे.
शेतकऱ्यांमध्ये संताप
उस्मानाबाद : सध्या वीज वितरण कंपनीकडून थकीत बिलांची वसुली सुरू करण्यात आली आहे. थेट ट्रान्स्फाॅर्मरच बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याकडे थकबाकी नसली तरी इतरांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा बंद हाेत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
स्वच्छतागृहातच अस्वच्छता
उस्मानाबाद : शहरातील श्री तुळजाभवानी स्टेडियममध्ये स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत; परंतु काही कुलूपबंद आहेत, तर काहींमध्ये स्वच्छता व पाण्याचा पत्ता नाही. त्यामुळे खेळाडूंना या स्वच्छतागृहाच्या बाबतीत ‘असून अडचण, नसून खेळंबा’ या म्हणीचा प्रत्यय येत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
स्टेडियममधील दिवे बंदच
उस्मानाबाद : खेळाडूंना सायंकाळी उशिरापर्यंत सराव करता यावा, यासाठी श्री तुळजाभवानी स्टेडियममध्ये दिवे बसविण्यात आले आहेत; परंतु बहुतांश दिवे बंदच आहेत. असे असतानाही याकडे क्रीडा विभागाकडून कानाडाेळा केला जात असल्याचा आराेप खेळाडू करू लागले आहेत.