- मारुती कदम
उमरगा (जि़उस्मानाबाद) : एका बाजूला दुष्काळामुळे गावागावातील लोक हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकत असताना उमरगा तालुक्यातील कोरगाव मात्र, टंचाईपासून कोसो दूर आहे़ ही किमया गावाने साधलीय ती जलसंधारणातूऩ तब्बल ५० लाखांची कामे लोकसहभागातून केल्याने येथे पावसाळ्यातील पाणी टिकवून ठेवण्यात गावकऱ्यांना यश आले आहे़
कोरगाव हे साधारणत: २ हजार लोकवस्तीचे गाव़ शेती हा इथला मुख्य व्यवसाय़ गावाशेजारीच साठवण तलाव् झाल्याने शेती आणखीच समृद्ध झाली़ सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे़ असे असतानाही सातत्याने कमी होत असलेला पाऊस लक्षात घेऊन इथल्या गावकऱ्यांनी एकत्र येत गेल्या काही वर्षांत जलसंधारणाची कामे हाती घेतली़ प्रकाश लवटे, लता बंडगर, दिलीप पांढरे, मनोहर बंडगर, सरपंच संजय बंडगर, उपसरपंच विश्वजीत खटके यांनी पुढाकार घेतला. सुमारे ५० लाख रुपयांची कामे करण्यात आली आहे़ गावाभोवलातून वाहणाऱ्या नाल्याचे सरळीकरण, खोलीकरण झाल्याने पावसाचे पाणी जागीच जिरविण्यात यश आले़ त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या विहिरीची व बोअरची पातळी चांगलीच वाढली आहे
परिणामी, आज सगळीकडे टंचाईच्या झळा बसत असतानाही कोरेवाडीत मात्र पाण्यासाठी वणवण दिसत नाही़ अगदी घरापर्यंत नळाने पाणी देण्यासाठी ग्रामस्थ विठ्ठल बंडगर यांनी दान दिलेल्या जागेत विहीर घेण्यात आली़ त्यासही मुबलक पाणी आहे़ आता पााणीपातळी खोलावत असल्याने शेजारच्या बोअरचे पाणी त्यात सोडले जात आहे़ हे पाणी नियमितपणे गावकऱ्यांना नळाद्वारे मिळते़ शिवाय, गावात तीन ठिकाणी सार्वजनिक जलकुंभ उभारुनही सोय करण्यात आली आहे़ इतकेच नव्हे सहा लाख रुपये खर्च करुन ग्रामपंचायतीने आरओ प्लांट उभारला आहे़ यातून नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी अल्पदरात दिले जात आहे़
मुख्यमंत्र्यांनीही केले अभिनंदऩ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मे रोजी दुष्काळी भागातील सरपंचाशी संवाद साधला़ यावेळी त्यांनी कोरगावचे सरपंच संजय पाटील यांच्याकडून दुष्काळाची माहिती घेतली़ पाटील यांनी गावात पाण्याच सुकाळ असल्याचे सांगताच मुख्यमंत्र्यांनीही संपूर्ण गावाचे अभिनंदन केल्याचे पाटील यांनी सांगितले.
भारनियमनाचा अडसर कोरेगाव शिवारात मुबलक पाणी उपलब्ध आहे़ त्यामुळे गावाचीओळख पाणीदार, अशी झाली आहे़ ग्रामस्थांना पुरविण्यासाठी आमच्याकडे भरपूर पाणी असले तरी त्यासाठी उच्च दाबाने वीज मिळत नसल्याने अडचण होत असल्याचे उपसरपंच विश्वजीत खटके यांनी सांगितले़