नऊपैकी आठ बंधाऱ्यांची दारे गायब : सिमेंट बंधाऱ्यांची मातीही वाहून गेली
बलसूर : यंदा परतीच्या दमदार पावसानंतर सिंचनाचा तसेच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती; परंतु या परिसरातील नऊपैकी आठ कोल्हापुरी बंधारे दरवाजाविना असून, अतिवृष्टीत सिमेंट बंधाऱ्याच्या बाजूची मातीही वाहून गेली. यामुळे पावसाचे पाणी आले तसे वाहून गेल्यामुळे दमदार पावसानंतरही हे जलसाठे रिकामेच राहिल्याचे चित्र आहे.
उमरगा तालुक्यातील बलसूर येथील शेत-शिवारातील मुख्य ओढ्यावर नऊ कोल्हापुरी बंधारे, तर आठ सिमेंट बंधारे आहेत. दोन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तसेच रोटरी क्लब व भारतीय जैन संघटना यांच्या मार्फत या ओढ्यावर नाला सरळीकरण व खोलीकरण करण्यात आले. यामुळे यात पाणी थांबल्यास परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी तसेच कूपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ होऊन २५० ते ३०० हेक्टर जमीन ओलिताखाली येईल, अशी अपेक्षा होती; परंतु मागील तीन-चार वर्षे एखादाही दमदार पाऊस झाला नाही. पावसाळ्यात केवळ रिमझिम पिकांना मुबलक असा पाऊस पडत गेल्याने जमिनीतील पाणी पातळी खालावली होती. पर्यायाने शेतातील पाण्याचे स्रोतही कोरडे पडले होते. जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर निर्माण झाल्याने पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत होती.
दरम्यान, यंदा या भागात परतीचा दमदार पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असले, तरी जमिनीतील पाणी पातळीत वाढ होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. आपली शेती बारमाही ओलिताखाली राहील या अपेक्षेने परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली; परंतु बलसूर शिवारातील नऊपैकी आठ कोल्हापुरी बंधारे दरवाजाविना असल्याने तसेच याच ओढ्यावरील सिमेंट बांधाच्या बाजूची माती अतिवृष्टीत वाहून गेल्याने पावसाचे पाणी आले तसे वाहून गेले. त्यामुळे शेतातील सिंचन विहिरी, कूपनलिका आता फेब्रुवारी महिन्यातच कोरड्या पडतील की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकूणच पाणी आडविण्यासाठी शासनाकडून लाखो रुपये खर्च होऊनही केवळ दारे बसविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने मोठा पाऊस होऊनही पाणी थांबले नसल्याने हा खर्च वाया गेल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.
(चाैकट)
येथील कोल्हापुरी बंधाऱ्याला मागील सात-आठ वर्षांपासून दारे नाहीत. त्यामुळे पाणी थांबत नाही. शेतकऱ्यांकडून पाठपुरावा करूनही याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे हे बंधारे केवळ शोभेची वस्तू बनून राहिले आहेत.
- ज्ञानेश्वर नागराळे, शेतकरी, बलसूर.
ओढा खोलीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पाणी थांबल्यास परिसरातील सिंचन विहिरी, कूपनलिका यांचे पाणी कायम टिकते. त्यामुळे आमच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, अतिवृष्टीने सिमेंट बांध फुटले तर कोल्हापुरी बंधाऱ्यांना दारेच नसल्याने पाणी थांबले नाही. आमच्या शेतातील फेब्रुवारीपर्यंतच पाणी टिकेल, असे वाटते.
- गंगाराम चिवरे, शेतकरी, बलसूर
केवळ दारे नसल्यामुळे पाऊस पडूनही बंधाऱ्यात पाणी थांबू शकले नाही. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सिमेंट बंधाऱ्याची दुरुस्ती करावी. तसेच बंधाऱ्यांना दारे बसवावेत. यामुळे भविष्यात तरी परिसरातील शेतकऱ्यांना याचा लाभ होईल.
- राम वाकडे, शेतकरी, बलसूर