नळदुर्ग : गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे तीर्थक्षेत्र बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडवे सुरू झाले आहेत. यामुळे परीसरातील भुईकोट किल्ल्यातील नयनरम्य नर- मादी हा धबधबा मंगळवार दि. २९ पासून कोसळू लागला आहे. मात्र, सध्या कोरोनामुळे हा किल्ला पर्यटनासाठी बंद असल्याने निसर्गप्रेमींना या विहंगम दृश्यापासून वंचित रहावे लागत आहे.
सोलापूर येथील युनिटी मल्टिकॉन कंपनीने पुरातत्त्व खात्याशी सामंजस्य करार करून किल्ल्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. तत्कालीन निजाम सरकाने बोरी नदी किल्ल्यात वळवून त्यावर मोठा बंधारा बांधून दोन धबधबे बांधून नदीच्या पात्रातील अतिरिक्त पाणी या दोन्ही धबधब्यातून वाहून जाण्याची व्यवस्था केली आहे. तलाव भरल्यानंतर सुरूवातीला मादी धबधब्यातून पाणी बाहेर पडते. पाणीसाठा वाढल्यानंतर नर धबधबा वाहतो. नर- मादी धबधब्यातील पाणी पुढे १०० फूटापेक्षा अधिक खाली खोल जाऊन आदळते. ते सुंदर दृश्य पाहताना अक्षरश: डोळ्यांचे पारणे फिटते.