लोकमत न्यूज नेटवर्क, धाराशिव : मागच्या लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने २३ जागा लढविल्या होत्या. त्या पूर्ण जागा यावेळीही आम्हीच लढवू, यावर आम्ही ठाम आहोत. आमच्या शिवसेनेला कोणी गृहीत धरू नये, असा इशारा सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी दिला.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आमची शिवसेना व आमचे मुख्यमंत्रीही लोकसभेच्या २३ जागांसाठी ठाम आहेत. मागच्या लढविलेल्या २३ पैकी १८ जागांवर आम्ही विजयी झालो होतो. या अठरा जागा तर लढवूच; पण पराभूत झालेल्या जागाही आम्ही सोडणार नाहीत. धाराशिव लोकसभेची जागाही आम्हीच लढवणार आहोत. कोणी आम्हाला गृहीत धरण्याचे कारण नाही. आमची शिवसेना स्वतंत्र आहे, असेही सावंत म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच भाजप नेते आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिवमध्ये आपल्या हक्काचा खासदार हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी भाजपला धाराशिवची जागा जिंकावी लागेल, असे उद्गार काढले होते. यावर सावंत यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.