धाराशिव : भाजपचे वरिष्ठ नेते माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पुलवामा घटना व ३०० कोटींच्या ऑफरसंदर्भात केलेल्या आरोपानंतर काँग्रेस पक्ष केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक झाला आहे. सोमवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाकचेरीसमोर आंदोलन करून केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर असल्याचे सांगत काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जबाब दो मोदी जबाब दो... आंदोलन करण्यात आले. ठरवून हत्याकांड करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, पुलवामा हत्याकांडात शहीद झालेल्या जवानांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. पुलवामा घटनेत केंद्र सरकारची अक्षम्य चूक झाली आहे, या वक्तव्यावर तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांना गप्प राहण्यास का सांगण्यात आले? भारतीय जवानांना दुसरीकडे पाठविण्यासाठी विमानाची मागणी केली असता, ती का नाकारण्यात आली? पुलवामा घटनेत वापरण्यात आलेले ३०० किलो आरडीएक्स कुठून आले? गुप्तचर यंत्रणांनी वारंवार दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष का केले गेले? सत्यपाल मलिक यांना आरएसएसचे महासचिव राम माधव यांनी ३०० कोटींची ऑफर दिली, यावर कारवाई केली जाणार का नाही, असे सवाल आंदोलनकर्त्यांनी केले. यावेळी आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, अग्निवेश शिंदे, प्रशांत पाटील, खलील सय्यद, राजाभाऊ शेरखाने यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.