उस्मानाबाद : शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. राष्ट्रवादीचे निष्ठावंत शिलेदार तथा पवारप्रेमी आता सक्रीय झाले आहेत. शनिवारी परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी संयुक्त पत्रकार परिषद घेवून ‘‘लढू अन् पुन्हा जिंकू’’ असा निर्धार व्यक्त केला. नेत्यांनी पक्ष सोडला असला तरी कार्यकर्त्यांची भक्कम फळी राष्ट्रवादीत कायम असल्याचा दावाही त्यांनी केला. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनामध्ये बळ भरण्यासाठी लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे डॉ़पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भाजपाचा भगवा झेंडा हाती घेतला आहे. दरम्यान, पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे निष्ठावंत शिलेदार सोमवारी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. यामध्ये जीवनराव गोरे यांच्यासह आमदार सतीश चव्हाण, आमदार राहुल मोटे, आमदार विक्रम काळे, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, संपत डोके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष अॅड. प्रवीण यादव यांचा समावेश होता. सुरूवातीला गोरे यांनी भूमिका मांडली. काही नेते भाजपात गेल्यामुळे राष्ट्रवादी पूर्णपणे संपली अशी, सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. परंतु, हे सत्य नाही. उस्मानाबादची जनता शरद पवार यांचे योगदान कधीच विसरणार नाही. जिल्ह्यात रेल्वे आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. एवढेच नाही तर १९९३ भूकंपानंतरचे त्यांचे कार्य अतुलनिय आहे. त्यामुळे यापूर्वी, सध्या आणि पुढेही शरद पवार हेच आमचे दैवत असतील. उस्मानाबाद, कळंब वगळता पक्षात फारशी पडझड झालेली नाही. नेत्यांनी पक्षांतर केले असले तरी कार्यकर्ते जागेवर असल्याचे ते म्हणाले. लवकरच पक्षाची नवीन कर्यकारिणी जाहीर करण्यात येईल. यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत उस्मानाबादेत मोठा मेळावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विकास करण्यास ‘त्यांना’ कोणी आडविले?‘‘जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपात जात आहे’’, असे आमदार पाटील यांनी सांगितले होते. मात्र त्यांच्या म्हणण्यात तथ्य नाही. केंद्र तसेच राज्यात राष्ट्रवादीची सत्ता असताना आ. पाटील यांना शरद पवार यांनी काय कमी केले? मंत्रीमंडळातील महत्वाची खाती, पदे त्यांच्याकडेच तर होती. तेव्हा त्यांना जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यास कोणी आडविले होते? असा सवाल आमदार विक्रम काळे यांनी केला. आजवर तरूणांना संधी मिळाली नाही. एकतर्फी सत्ता होती. त्यामुळे असंख्य तरूण वर्तुळाबाहेर होते. हे सर्वजण आता पक्षात सक्रीय होत असल्याचा दावा त्यांनी केला.
काही मंडळी सत्तेविना राहू शकत नाही शरद पवार आपल्या हृदयात असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले होते. असे जर असले तर त्यांचे हृदय नेमके किती मोठे आहे? हे तपासावे लागेल. अशी वाक्य केवळ बोलण्यापुरती असतात. हे खरे असते तर त्यांनी अडचणीच्या काळात शरद पवार यांची साथ सोडली, असा अरोप आमदार चव्हाण यांनी केला. नेत्यांनी पक्षांतर केले असले तरी तळागळातील कार्यकर्ते, पदाधिकारी पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत, असेही ते म्हणाले. जिल्हा परिषदेत सत्तांतर होणार का? असा सवाल केला असता, काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.