उमरगा (जि. उस्मानाबाद) : आम्ही कोणाची कळ काढत नाही अन् काढली तर त्यांना महाराष्ट्र सोडत नाही, असा सज्जड इशारा देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर पलटवार केला.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ उमरगा येथे शरद पवार यांची सभा झाली. यावेळी ते म्हणाले, मोदी यांना पाच वर्षांत काय केले हे सांगता येत नाही. त्यामुळे ते कुटुंबावर बोलतात. गांधी-नेहरू घराण्याला शिव्या घालतात.
७० वर्षांत काहीच झाले नाही म्हणतात, कारण त्यांना इतिहास आठवत नाही. काँग्रेसने आणि या देशातील जनतेने सैन्य दलाचा नेहमी सन्मान केला आहे. परंतु, त्याचा राजकीय फायदा कोणी उचलला नाही. मात्र देशात पहिल्यांदाच सैन्याचा राजकीय लाभ घेतला जात आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील वायूदल अधिकारी अभिनंदन यांना सोडविले की, यांची छाती ५६ इंचाची होते. मग तीन वर्षांपासून एक सैनिक पाकिस्तानच्या तुरुंगात आहे, मग त्यावेळी यांची छाती का १५ इंचाची झाली.
मोदींनी ५५ महिन्यांत ९२ विदेश दौरे केले. देशात १ रुपया आणला नाही. नवीन उद्योग नाही. बेरोजगारी वाढली. त्यावर न बोलता धर्मांध भावना निर्माण करणारे विधान त्यांच्याकडून होते हे दुर्दैव आहे. भाजपचे नेते शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना ‘लावारीस’ म्हणतात. देशातील सैन्याला ४० अतिरेकी मारले म्हणतात, असल्या नेत्यांना मते मागण्याचा अधिकार नाही, असा घणाघातही पवार यांनी केला.
यावेळी मंचावर माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. काँग्रेसने सैन्य दलाचा नेहमी सन्मान केला आहे. परंतु, त्याचा राजकीय फायदा कोणी उचलला नाही. मात्र पाकिस्तानच्या ताब्यातील वायू दल अधिकारी अभिनंदन यांना सोडविले की, यांची छाती ५६ इंचाची होते.