भूम : उपविभागीय मनिषा राशीनकर यांच्या लाचप्रकरणाने गौण खनिजाचा गोरखधंदा उजेडात आलेल्या भूम तालुक्यात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शुक्रवारी अचानक कारवाया सुरू केल्या. आढावा बैठकीच्या निमित्ताने गेलेल्या दिवेगावकर यांनी सात खडीकेंद्र सील करून उत्खननाचे मोजमाप करण्याचे आदेश गौण खनिज विभागास दिले आहेत. त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले.
जिल्ह्यातील सर्वाधिक अवैध गौण खनिज उत्खनन अन् वाहतुकीचा व्यवसाय परंडा तालुक्यात चालतो. लगतच्या भूम तालुक्यातही तो फोफावला आहे. येथे डोंगराळ भाग अधिक असल्याने वाळूपेक्षाही खडीचा धंदा जोमात आहे. परवानगीपेक्षा अधिक उत्खनन करुन रॉयल्टी बुडवतानाचा नियमांचे उल्लंघनही सर्रास केले जाते. या भागातील गौण खनिजातील हप्तेखोरी नुकतीच राशीनकर यांच्या प्रकरणाने उजेडात आणली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शुक्रवारी भूम तालुक्याकडे आपला मोर्चा वळविला. तहसील कार्यालयात आढावा बैठकीचे निमित्त साधून त्यांनी अचानक खडी केंद्रांकडे धाव घेतली. तेथील उत्खननाची चौकशी करत पुढील कार्यवाहीसाठी ७ खडीकेंद्र सील करण्याचे निर्देश त्यांनी जागेवरच दिले. त्यानुसार महसूलच्या पथकाने खडीकेंद्र सील करण्याची कार्यवाही केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, भूमचे प्रभारी उपविभागीय अधिकारी सचिन गिरी, तहसिलदार उषाकिरण श्रृंगारे, मंडळ अधिकारी एस. एस. पाटील, संजय स्वामी, तलाठी वाय. यु. हाके, व्ही. आर. थोरात, ए. एम. धानोरे उपस्थित होते. सील करण्याची कार्यवाही नायब तहसीलदार पी.व्ही. सावंत व लावंड यांच्या पथकाने केली.
हे आहेत कार्यवाही झालेले खडीकेंद्र...
भूम तालुक्यातील दुधोडी येथील श्री दत्त स्टोन क्रशर, अंजनसोंडा येथील अमरजित स्टोन क्रशर, साईराज स्टोन क्रशर नागेवाडी, विठ्ठलसरु स्टोनक्रशर पाडोळी, परमेश्वर खडी केंद्र ईट, शंकर स्टोन क्रशर भूम व हाडोंग्री येथील शिवखेडा खडी क्रशरला सील ठोकण्यात आले आहे. यापैकी शिवखेडा स्टोन खडी क्रशर येथील येथे जिल्हाधिकाऱ्यांनी उत्खननाचे मोजमाप करण्याच्या सूचना करतानाच तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून दररोज किती डस्ट व खडी तयार केली, याचीही माहिती घेण्याचे निर्देश दिले.